काँग्रेस शासनाने मोठय़ा प्रमाणात केलेले घोटाळे निस्तरताना आमचे वर्ष लोटले, या घोटाळय़ातील दोषींना शासन निश्चित होईल. याचबरोबर रखडलेल्या प्रकल्पांना मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असून, राज्यातील दुष्काळ संपूर्णत: नाहीसा करण्याचा विडाच आम्ही उचलला असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. लोकनेते बाळासाहेब देसाई हे महाराष्ट्रातील जनतेने ‘लोकनेते’ हे सर्वोच्च पद बहाल केलेले पोलादी पुरूष; पण काँग्रेसच्या राजवटीत त्यांना किती न्याय मिळाला? करारी आणि निष्ठावंत लोकनेत्यांना मुख्यमंत्रीपदापासून दूर ठेवले गेले हे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याची खंत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
पाटणनजीकच्या लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव देसाई यांचा ७२ वा जयंतीदिन कार्यक्रम, लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे शताब्दी स्मारकाचे भूमिपूजन आणि युती शासन वर्षपूर्ती सत्कार समारंभ या कार्यक्रमात ते बोलत होते. परिवहनमंत्री दिवाकर रावते, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, पालकमंत्री विजय शिवतारे, सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे, कार्यक्रमाचे निमंत्रक आमदार शंभूराज देसाई यांची या वेळी उपस्थिती होती.
फडणवीस म्हणाले, की गेल्या ३२ वर्षांत आघाडी सरकारला लोकनेत्यांचे स्मारक उभारणे शक्य झाले नाही. पण, त्यांच्या स्मारकाचे भूमिपूजन करण्याचा मान आम्हाला मिळाल्याचा सार्थ अभिमान वाटतो. लोकनेत्यांच्या कार्याचा वसा जपणारे अभ्यासू आमदार शंभूराज देसाई यांनी आपले कर्तृत्व सिध्द केले असून, त्याचा वरिष्ठ पातळीवर नक्कीच योग्य विचार केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून ६ हजार २०० गावांमध्ये सव्वालाखांपेक्षा अधिक कामे करून, केवळ ९ महिन्यात १,४०० कोटी रूपये खर्च करून, २४ टीएमसी पाणी अडवले आहे. तर, ८ हजार कोटींची मदत शेतकऱ्यांना केली आहे. शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाणारे आमचे सरकार असून, गरज पडल्यास कर्ज काढू, पण शेतकऱ्यांना मदत केलीच जाईल. युती सरकार आल्यापासून अनेक पथदर्शी प्रकल्प राबवले जात असून, राज्याला सन २०१९ पर्यंत पाणी टंचाईमुक्त करू, शेतकऱ्यांना २ हजार कोटींचे पॅकेज दिले आहे. आता, एफआरपीनुसार ऊसदर मिळालाच पाहिजे हा सरकारचा निर्धार असल्याचे त्यांनी सांगितले.
रावते म्हणाले, की लोकनेता कसा असावा, हे बाळासाहेब देसाई यांनी दाखवून दिले. काँग्रेसने खऱ्या अर्थाने अशा पोलादी पुरूषाची कुचंबणाच केली. पश्चिम महाराष्ट्रात पुरेशा प्रमाणात पाणी नसताना, हे पाणी कोणीतरी स्वत:च्या फायद्यासाठी पळवून नेत असल्याचे दुर्दैव आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
शंभूराज देसाई म्हणाले, की १९४१ ते ८३ पर्यंत लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी महाराष्ट्र राज्याचे एकनिष्ठपणे नेतृत्व केले. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात बांधकाम, महसूल, गृहमंत्री अशी पदे अत्यंत जबाबदारीने विश्वासाने पार पाडली व राज्याला दिशा दिली असताना काँग्रेसच्या काही नेत्यांनी त्यांना जाणुनबुजून बाजूला ठेवले. १९८३ साली त्यांचे निधन झाले. पण, सरकारला साधे स्मारक बांधता आले नाही. काँग्रेस पक्षासाठी लोकनेत्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले. त्यांच्या स्मारकासाठी ३२ वष्रे वाट पहावी लागली. मात्र, युती सरकारच्या माध्यमातून आज हे स्मारक उभे राहत असल्याचा अभिमान आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा