Happy New Year 2025 : आज नवीन वर्षाची अर्थात २०२५ या नव्या वर्षाची सुरुवात झाली आहे. २०२४ या वर्षाला निरोप देत २०२५ या नव्या वर्षाची सुरुवात जगभरात जल्लोषात झाली आहे. देशभरातील विविध ठिकाणी नव्या वर्षाच्या स्वागतासाठी वेगवेगळ्या कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. याबरोबरच अनेकांनी या नव्या वर्षांत वेगवेगळे संकल्पही केले आहेत. राजकीय नेतेमंडळींकडून देखील २०२५ या नव्या वर्षासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत. तसेच नववर्षाच्या शुभेच्छांसाठी सोशल मीडियावरही शुभेच्छांचा वर्षाव सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील राज्यातील जनतेला नव्या वर्षासाठी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत.
देवेंद्र फडणवीसांनी काय शुभेच्छा दिल्या?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Post) यांनी राज्यातील जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा देताना ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही’ असा संकल्प केला. तसेच राज्यातील कष्टकरी, शेतकरी, कामगार आणि प्रत्येक नागरिकाच्या योगदानाने महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शांतता-सलोखा वाढवत, पर्यावरण जपत आणि विकासासोबत आधुनिकीकरणाच्या दिशेने महाराष्ट्राला अग्रगण्य बनवण्याचे उद्दिष्ट ठेऊन सकारात्मक ऊर्जेने भरलेल्या या संकल्पांची नववर्षात पूर्तता होईल, अशी मनोकामना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. तसेच २०२५ मध्ये पाऊल ठेवताना एकता आणि दृढनिश्चयाने नवीन संधींचे स्वागत करूया. हे वर्ष सर्वांना उत्तम आरोग्य, आनंद आणि भरभराटीचे जावो. २०२५ या नव्या वर्षाच्या सर्वांना मनःपूर्वक आणि आरोग्यदायी शुभेच्छा”, असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा देताना 'महाराष्ट्र आता थांबणार नाही' असा संकल्प केला. राज्यातील कष्टकरी, शेतकरी, कामगार आणि प्रत्येक नागरिकाच्या योगदानाने महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शांतता-सलोखा…
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 31, 2024
हेही वाचा : Raj Thackeray Post: राज ठाकरेंच्या नवीन वर्षानिमित्त ‘सूचक’ शुभेच्छा; म्हणाले, “माझं मंथन चालू आहे, लवकरच…”!
एकनाथ शिंदेंनी काय म्हटलं?
“राज्यातील तमाम बंधू-भगिनींनो,गोड आणि कटू अशा अनेक संमिश्र क्षणांनी एकवटलेले २०२४ हे वर्ष आता सरलं, तर दुसरीकडे नव्याने उभारी घेण्याची उत्तुंग स्वप्नं दाखवत येणारे #२०२५ साल आपल्याला खुणावत आहे. आपण सर्वजण येणाऱ्या नवीन वर्षात नवी स्वप्नं, नवी आशा, नव्या आकांक्षा, नवे संकल्प, नवी दिशा उरात बाळगून आहोत. परंतु, नववर्षाचे स्वागत करताना आपल्या उत्साहाचा, कृतीचा, आचाराचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे कोणालाही त्रास होणार नाही याची एक सुज्ञ व सुजाण नागरिक म्हणून आपण सर्वांनी स्वतःहून काळजी घेणे आवश्यक आहे. पोलीस तसेच इतर सरकारी यंत्रणा त्यांचे कर्तव्य योग्य प्रकारे बजावतील यात मला तीळमात्र शंका नाही. आपण सर्वांनी सुद्धा त्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे. चला तर मग, आपण सर्वजण मिळून सरणाऱ्या २०२४ सालास निरोप देत येणाऱ्या २०२५ या नववर्षाचे आनंदाने आणि उत्साहाने स्वागत करूया”, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
प्रत्येक कुटुंबात सुखसमृध्दीची पावले उमटावीत…
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 31, 2024
सरत्या वर्षाने महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक घटकासाठी काही ना काही दिले, सामान्य नागरिकांच्या घरात सुखसमाधान नांदू लागेल, यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. नव्या वर्षात दुप्पट नव्हे, तिप्पट जोमाने महाराष्ट्रातील…
‘प्रत्येक कुटुंबात सुखसमृध्दीची पावले उमटावीत‘
“सरत्या वर्षाने महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक घटकासाठी काही ना काही दिले, सामान्य नागरिकांच्या घरात सुखसमाधान नांदू लागेल, यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. नव्या वर्षात दुप्पट नव्हे, तिप्पट जोमाने महाराष्ट्रातील जनतेच्या सुखसमृध्दीसाठी राज्य सरकार काम करेल. विकसित भारतासाठी महाराष्ट्राचे योगदान आपण सर्वजण देत राहू. सुखाचे स्मितहास्य किंवा मोकळा श्वास घेणे म्हणजे काय, याचा अर्थच जणू गेल्या दोन-अडीच वर्षात महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला समजला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या विकासकार्याच्या महायज्ञात महाराष्ट्रानेही आपला वाटा उचलला. यापुढेही नवे स्वप्न, नवा उत्साह आणि नवा ध्यास घेऊन आपण सगळेजण नवी सुरुवात करू. समाजातल्या दुर्बल गोरगरीब घटकांना मदत करून त्यांचे जीवन कसं आनंदी होईल, यासाठी आपण निर्धार करूयात. ‘विकसित भारत’ आणि ‘प्रगतिशील महाराष्ट्र’ या ध्येयासाठी गेली दोन वर्षे आपण झटलो, आता नव्या वर्षात हा जोर आणखी वाढवूया. किंबहुना, तोच आपला नववर्षाचा संकल्प असला पाहिजे. राज्यातला प्रत्येक नागरिक प्रगतीच्या मार्गावर चालत राहावा, यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे. ‘प्रत्येक कुटुंबात सुखशांती’ हेच आपलं लक्ष्य आहे. एकत्र येऊन आपण बलशाली आणि समृद्ध महाराष्ट्र निर्माण करू”, अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
राज्यातील जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) January 1, 2025
हे नवीन वर्ष राज्यातील जनतेला विकासाच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देणारं, महाराष्ट्राला सर्वांगीण प्रगतीच्या वाटेवर घेऊन जाणारं ठरेल, असा विश्वास व्यक्त करतो. नवीन २०२५ वर्ष सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन… pic.twitter.com/76aPZq3GB5
अजित पवारांनी काय शुभेच्छा दिल्या?
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Post) यांनी राज्यातील नागरिकांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. अजित पवार यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत म्हटलं आहे की, “राज्यातील जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! हे नवीन वर्ष राज्यातील जनतेला विकासाच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देणारं, महाराष्ट्राला सर्वांगीण प्रगतीच्या वाटेवर घेऊन जाणारं ठरेल, असा विश्वास व्यक्त करतो. नवीन २०२५ वर्ष सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो, अशा सदिच्छा देतो. नववर्षाचं स्वागत उत्साहानं मात्र, आरोग्यभान राखत संयमानं करा, असं देखील आवाहन करतो. महाराष्ट्रवासियांची एकजूट आणि निर्धाराच्या बळावर आपण आतापर्यंत राज्यावर येणाऱ्या प्रत्येक आव्हानांचा यशस्वी मुकाबला केला. महाराष्ट्राची ही एकजूट यापुढेही कायम ठेवायची आहे. कृषी, उद्योग, व्यापार, शिक्षण, सहकार, कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, सामाजिक सुधारणा अशा अनेक क्षेत्रात महाराष्ट्र नेहमीच देशात अव्वल राहिला आहे. महाराष्ट्राचं हे अव्वल स्थान कायम ठेवण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करूया. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर सुरू असलेली आपली वाटचाल कायम ठेवून महाराष्ट्राला, देशाला विकासाच्या दृष्टिकोनातून आणखी गतिमान करूया”, अशा शब्दांत अजित पवारांनी नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.