Innovation City In Maharashtra : राज्यातील स्टार्टअप इकोसिस्टमला चालना देण्यासाठी महाराष्ट्रात गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी (गिफ्ट सिटी) प्रमाणेच एक इनोव्हेशन सिटी स्थापन करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली.

यावेळी फडणवीस यांनी, पुढील दोन महिन्यांत सरकार एक नवीन स्टार्टअप धोरण अंतिम करण्याची योजना आखत असल्याचे सांगितले. राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त मुंबईत आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी १०० कोटी रुपयांचा निधी उभारण्यासाठी भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) सोबत सामंजस्य करारचीही घोषणा केली.

इनोव्हेशन सिटीबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “नवोपक्रमावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आम्ही गिफ्ट सिटीप्रमाणे एक इनोव्हेशन सिटी तयार करणार आहोत. पुढील दोन महिन्यांत, महाराष्ट्र सरकारकडून सर्वात प्रगतीशील स्टार्टअप धोरण तयार केले जाईल आणि यामध्ये बदल सुचवण्यासाठी ते सर्वांना उपलब्ध करून दिले जाईल.”

मुंबई स्टार्टअप कॅपिटल

“गुंतवणूक आणि मूल्याच्या बाबतीत महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे, त्यामुळे मुंबई स्टार्टअप कॅपिटल आहे”, असेही देवेंद्र फडणवीसांनी म्हटले.

महाराष्ट्र सरकारने सुरक्षा क्षेत्रासाठी फंड ऑफ फंड्स निर्माण केला आहे. त्याचबरोबर या क्षेत्रातील ३०० सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि स्टार्टअप्सना राज्याच्या फंड ऑफ फंड्सद्वारे निधी देण्यात आल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरला श्रेय

केंद्र सरकारच्या अहवालाचा दाखला देत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतातील सर्वोच्च स्टार्ट-अप इकोसिस्टम म्हणून राज्याच्या क्रमवारीबद्दल अभिमान व्यक्त केला. त्यांनी या यशाचे श्रेय मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर यासारख्या शहरांना दिले.

कृत्रिम बुद्धिमत्तचे महत्व

जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात क्रांतिकारी शक्ती म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ता स्वीकारण्याचे महत्त्व फडणवीस यांनी यावेळी अधोरेखित केले. राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे एआय केद्रांमध्ये रूपांतर करण्याच्या योजनेबाबतही फडणवीस यांनी माहिती दिली.

यावेळी फडणवीस यांनी जागतिक दर्जाचे एआय आणि स्टार्ट-अप इकोसिस्टम तयार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत भागीदारी करण्याचे आवाहन अनेक कंपन्यांना केले आहे.

Story img Loader