Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी (१० जानेवारी) विदर्भाच्या दौऱ्यावर होते. यावेळी नागपूरमध्ये जिव्हाळा पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विविध राजकीय प्रश्नांवर अगदी रोखठोक उत्तरं दिलं. राज ठाकरे की उद्धव ठाकरे? एकनाथ शिंदे की अजित पवार? नरेंद्र मोदी की अमित शाह अशा विविध प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी मनमोकळेपणाने उत्तरं दिली. दरम्यान, याचवेळी मुख्यमंत्री फडणवीस यांना राष्ट्रीय अध्यक्ष व्हायला सांगितलं तर व्हाल का? असा प्रश्न विचारला. यावर अगदी मोजक्या पण थेट शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिलं.
राष्ट्रीय अध्यक्ष व्हायला सांगितलं तर व्हाल का?
अनुशासन पाळायचं म्हणून जर पक्षाने तुम्हाला राष्ट्रीय अध्यक्ष व्हायला सांगितलं तर व्हाल का? की मुख्यमंत्रीच राहायला आवडेल? या प्रश्नाचं उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी सूचक उत्तर दिलं. ते म्हणाले, “पक्ष जे सांगेल ते करायचं. माझं नेहमी एक म्हणणं असतं की मी मोठा झालो म्हणजे ही माझी क्षमता होती म्हणून नाही, तर माझ्या पाठीशी पक्ष उभा होता म्हणून. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षात अनेक नेते होते. मग त्यामध्ये कदाचित माझ्यापेक्षाही चांगले असतील. त्यावेळी त्यांना संधी नाही मिळाली मला संधी मिळाली, पक्षाने दिली. त्यामुळे माझं ठाम मत आहे की जर माझ्या पाठिमागचा भारतीय जनता पक्ष जर काढला तर मला जास्त कोणी विचारणार नाही”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
हेही वाचा : एकनाथ शिंदे की अजित पवार, अधिक विश्वासू सहकारी कोण? देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक उत्तर
फडणवीस पुढे म्हणाले की, “माझा असा गैरसमज देखील नाही की मी स्वत:चा पक्ष तयार करून काही मोठं काम करु शकतो. जर मी भारतीय जनता पार्टीशिवाय उभा राहिलो तर माझ्यासह सर्वांची डिपॉजिट जप्त होतील. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्राच्या सामाजिक व्यवस्थेमध्ये माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला मुख्यमंत्री बनवण्याची रिस्क घेणं हे फक्त भाजपा आणि नरेंद्र मोदीच करु शकतात. कारण ज्या प्रकारे राजकीय गणितं असतात, म्हणजे मला पहिल्यांदा मुख्यमंत्री केलं तेव्हा हा प्रश्न निश्चित समोर आला असेल. त्यामुळे मला हे १०० टक्के माहिती आहे की माझी जी ओळख आहे ती भारतीय जनता पक्षामुळेच आहे. त्यामुळे मला पक्ष जे सांगेल ते मी करेल. मी नेहमी सांगतो की मला जर पक्षाने सांगितलं की तुम्ही थरी जाऊन बसा तर मी प्रतिप्रश्नही करणार नाही घरी जाऊन बसेल”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
एकनाथ शिंदे की अजित पवार अधिक विश्वासू सहकारी कोण?
यावेळी फडणवीसांना विचारण्यात आलं की खूप मनापासून विश्वास टाकावा असा सहकारी कोण? एकनाथ शिंदे की अजित पवार? यावर फडणवीस म्हणाले, “तुम्ही माझ्यापुरतं विचाराल तर या दोन्ही नेत्यांशी माझे अतिशय जवळचे संबंध आहेत. त्या दोघांचे वेगवेगळ्या लोकांशी वेगवेगळे डायनॅमिक्स असू शकतात. एकनाथ शिंदे आणि माझी जुनी मैत्री आहे. परंतु, अजित पवार यांच्याकडे जी राजकीय परिपक्वता आहे त्यामुळे त्यांची आणि माझी व्हेवलेंथ जुळते.”