राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून गुरूवारी आपला उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित होते. त्यांच्याबरोबर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा नेता कन्हैय्या कुमार हा देखील आवर्जुन उपस्थित राहिला. यावेळी “देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत, ते मॉडेल आहेत”, अशी घणाघाती टीका कन्हैय्या कुमारने केली.

“हल्ली सरकारकडून केंद्रीय संस्थांचा वापर पक्षाच्या हितासाठी केला जातो आहे. जो माणूस भ्रष्ट आहे, तो भाजपात गेला की तो अचानक सदाचारी कसा काय होतो? जेव्हा शेतकरी आत्महत्या, दुष्काळ या घटनांनी ग्रासला होता, तेव्हा मुख्यमंत्री मात्र फोटोशूट करण्यात व्यस्त होते. त्यामुळे असं वाटत होतं की महाराष्ट्राने मुख्यमंत्री निवडला नसून मॉडेलच निवडला आहे”, अशी खोचक टीका कन्हैय्याने केली.

आव्हाड यांनी अर्ज भरताना पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी कन्हैय्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. “सध्याचं राजकारण खूप वाईट आहे. राजकीय वातावरण फार खराब झालं आहे. काहीही करून विरोधकांना नेस्तनाबूत करायचं असा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे. पण आम्ही मात्र आमची लढाई सुरूच ठेऊ”, असा विश्वासही कन्हैया कुमारने व्यक्त केला.

देश वाचवायचा असेल तर पुरोगामी विचार आत्मसात करावे लागतील. आपण धर्मनिरपेक्षता मानणारे आहोत. पण महाराष्ट्रात धर्मनिरपेक्षतेचा आवाज फक्त जितेंद्र आव्हाड यांच्यात दिसतो. मला त्यांचे विचार पटतात. २ ऑक्टोबरला जगाने गांधी जयंती साजरी केली. पण, ट्विटरवर गोडसे अमर रहे ट्रोल होते, याची लाज वाटली पाहिजे, असेही कन्हैय्या म्हणाला.