CM Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज एका कार्यक्रमात बोलताना एक मोठं विधान केलं. “आमचे पीएस आणि ओएसडी देखील मुख्यमंत्रीच ठरवत असल्यामुळे आमच्या हातात काही राहिलं नाही”, असं म्हणत मंत्री माणिकराव कोकाटे यांनी एक प्रकारे नाराजीच व्यक्त केली. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. दरम्यान, यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी माणिकराव कोकाटे यांच्या विधानाच्या संदर्भात प्रश्न विचारला असता यावर देवेंद्र फडणवीस यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. “मंत्र्यांचे पीएस आणि ओएसडी नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचाच आहे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“माणिकराव कोकाटेंना हे माहिती नसेल की मंत्र्यांचे पीएस आणि ओएसडी नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचाच आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव मंत्री मुख्यमंत्र्यांकडे पाठवत असतात. त्यावर मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेत असतात. हे काही आता नव्याने होत नाही. मी मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्पष्टपणे सांगितलं होतं की तुम्हाला पाहिजे ती नावे पाठवा. पण त्या नावांमध्ये ज्यांची नावे फिक्सर म्हणून किंवा ज्यांची नावे चुकीच्या कामांमध्ये घेतले गेलेले आहेत त्यांना मी मान्यता देणार नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“तसेच आतापर्यंत माझ्याकडे १२५ च्या जवळपास नावे आले आहेत. त्यातील मी १०९ नावे क्लिअर केली आहेत. राहिलेले नावे मी क्लिअर केलेली नाहीत. कारण कोणता न कोणता आरोप त्यांच्यावर आहे. तसेच कोणती न कोणती चौकशी त्यांच्यावर सुरु आहे. त्यामुळे कोणी नाराज झालं तरीही मी अशा नावांना मान्यता देणार नाही”, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे भेटीवर फडणवीसांचं भाष्य
गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटी वाढल्या आहेत. कालही ते एका लग्नसोहळ्यात एकत्र दिसले होते. याबाबत देवेंद्र फडणवीसांना विचारलं असता, ते म्हणाले, “या भेटीवर मी काही बोलू शकत नाही. पण राज्यात कोणीही कोणाशी सुसंवाद करत असेल तर मी त्याचं स्वागत करेन. आपणही सर्वांनी ९ वाजताच्या भोंग्याला सुसंवाद कसा करावा हे शिकवलं तर राज्यातील संवादाची परिस्थिती सुधारेल”, असा टोमणाही देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांना लगावला.
माणिकराव कोकाटे काय म्हणाले होते?
“आम्हाला मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच दिवशी दम दिला. आता माझ्यासह तुमच्या कोणाच्या जाण्यामुळे सरकारवर काहीही परिणाम होणार नाही. त्यामुळे जास्त मस्ती कराल तर घरी जाल. विभागाचं काम शिस्तीत झालं पाहिजे. आम्हाला १०० दिवसांचा कार्यक्रम देखील दिला. आमचे पीएस आणि ओएसडी सुद्धा मुख्यमंत्रीच ठरवतात, हे देखील मी तुम्हाला सांगतो. त्यामुळे आमच्याही हातात काही राहिलं नाही. त्यामुळे आम्हाला नीट काम करावंच लागेल आणि तुम्हीही नीट काम करा, म्हणजे सरकारबरोबर आणि आपली चांगली सांगड बसली पाहिजे तर समाजात एकप्रकारचं स्थैर्य निर्माण होईल”, असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे.