Devendra Fadnavis : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणाचा भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्यासह अजून काही नेत्यांनी आवाज उठवला. यानंतर या घटनेतील आरोपींना पोलिसांनी अटक केलं. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी तीन यंत्रणांच्या माध्यमातून सुरु आहे. दरम्यान, खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचे आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे संबंध असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. यावरून भाजपाचे नेते सुरेश धस यांनीही अनेकदा टीका केली. पण काही दिवसांपूर्वी सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याची माहिती समोर आल्यामुळे चांगलंच राजकारण तापलं आहे.

यावरून राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. यानंतर स्वत: सुरेश धस यांनी या भेटीबद्दल स्पष्टीकरणही दिलं. सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याचे मान्य करत आपण त्यांच्या डोळ्याच्या शस्त्रक्रियेनंतर तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेटल्याचं सांगितलं. दरम्यान, सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीवर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. “कोण कोणाला भेटलं? यावर राजकारण होत असेल तर लोकशाहीमध्ये ते योग्य नाही”, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“कोण कोणाला भेटलं यावर राजकारण होत असेल तर लोकशाहीमध्ये ते योग्य नाही. लोकशाहीमध्ये संवाद सुरु राहिला पाहिजे. तसेच सुरेश धस यांनी मस्साजोगच्या प्रकरणात खंबीर भूमिका घेतलेली आहे. त्यांची भूमिका सर्वांनी पाहिली आहे. अशा प्रकारे खंबीर भूमिका घेत असताना कोणाशी संवाद तोडून टाकायचा असं करण्याची आवश्यकता नाही. कारण धनंजय मुंडे हे देखील राज्याचे मंत्री आहेत. मग एखादा आमदार एखाद्या मंत्र्यांना भेटला तर कोणताही फरक पडत नाही. तसेच सुरेश धस यांनी देखील सांगितलं आहे की धनंजय मुंडेंची भेट घेतली असली तरी कोणत्याही परिस्थितीत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्य़ांना शिक्षा झाली पाहिजे हाच हेतू समोर ठेवून काम करत आहेत. पण काही लोकांना असं वाटतं की सुरेश धस पुढाकार का घेत आहेत? यावरून त्यांच्या पोटात दुखतंय”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

योग्यवेळी पर्दाफाश करणार : सुरेश धस

“दोन गोष्टी एकत्र केल्या गेल्या. त्यामध्ये एक म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमच्या दोघांची लावलेली बैठक आणि मी धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी त्यांना भेटायला गेलो. या दोन्ही गोष्टी एकत्र झाल्या. चंद्रशेखर बावनकुळे यांची त्याबाबतीमधील प्रतिक्रिया झाली. त्यानंतर धनंजय मुंडेंना मी भेटल्याचंही टिव्हीवर आलं किंवा ते लीक करण्यात आलं. याबाबत माझं असं मत आहे की याबाबत कोणीतरी व्यवस्थित माझ्याविरोधात षडयंत्र रचतंय. हे षडयंत्र कोण रचतंय हे देखील मला माहिती आहे. ही गोष्ट मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालणार आहे. तसेच हे जे कोण षडयंत्र रचतंय त्याचा पर्दाफाश मी योग्यवेळी करणार आहे”, असं सुरेश धस यांनी म्हटलं होतं.

Story img Loader