CM Devendra Fadnavis on chargesheet filed in santosh Deshmukh murder Case : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची गेल्या अनेक दिवसांपासून सर्वत्र चर्चा होत आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोषारोप पत्र दाखल केले आहे. ज्यामध्ये खंडणीत आडवे आल्याने संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच या प्रकरणात वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचे उघड झाले आहे. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांकडून तसेच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांकडून या प्रकरणातील आरोपींनी कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे. या दरम्यान तपास अधिकाऱ्यांनी दोषारोप पत्र दाखल केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी आरोपींना कठोर शिक्षा मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे,

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे येथे माध्यमांशी बोलताना याबद्दल राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पोलिसांनी अतिशय प्रोफेशनल तपास केला आहे. नवीन कायद्याचा अवलंब करून योग्य वेळेमध्ये आणि संपूर्ण पुराव्यांसह आरोपपत्र दाखल केले आहे. आता आम्ही कोर्टालाही विनंती करणार आहोत की त्यांनी ही केस फास्ट ट्रॅकवर चालवावी. उज्वल निकम यांची आपण नियुक्ती केली आहे आणि मला विश्वास आहे की जे आरोपी आहेत त्यांना कठोरतम शिक्षा कोर्ट देईल, असे फडणवीस म्हणाले.

पुरावे काय सादर केले?

पवन उर्जा प्रकल्पात ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या ‘आवादा’ कंपनीकडून दोन कोटी रुपयांची खंडणी मागणारा वाल्मिक कराड यांचा आवाज आणि कंपनीतील कर्मचाऱ्यांचे आवाजाचे एकमेकांशी जुळणारे नमूने, हत्या प्रकरणातील आरोपींचा खंडणीशी गुन्ह्याशी असणारा सहसंबध दाखविणारे सीसीटिव्ही चित्रणे यासह राज्य गुन्हा अन्वेषण विभागाने संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषारोप पत्र दाखल केले आहे.

तसेच या प्रकरणात सुमारे १८० साक्षीदार, पंच यांच्या मदतीने तपासानंतर केल्यानंतर दाखल गुन्ह्यातील आरोपींचा सूत्रधार वाल्मिक कराड असल्याने त्यास पहिल्या क्रमांकाचा आरोपी बनविण्यात आले आहे. तपास अधिकारी बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या तपासातील ‘डिजिटल’ स्वरुपाचे पुरावे न्यायवैधक प्रयोगशाळेकडून तपासून दोषारोप तयार करण्यात आले आहे.