CM Devendra Fadnavis On Hindi in Schools: राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने म्हणजेच एससीईआरटीने नुकताच ‘राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४’ तयार केला आहे, जो सुरू होत असलेल्या शैक्षणिक वर्षापासून लागू केला जाणार आहे. यानुसार मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील पहिली ते पाचवी इयत्तेच्या विद्यार्थ्यांना मराठी व इंग्रजीसह आणखी एक भारतीय भाषा शिकता येणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात हिंदी भाषा अनिवार्य केल्याच्या चर्चा सुरू असून यावरून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर हिंदी लादली जात असल्याच्या आरोपावर अखेर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस या मुद्द्यावर बोलताना म्हणाले की, “मराठीच्या ऐवजी हिंदी अनिवार्य केलेली नाही. मराठी अनिवार्यच आहे. पण नवीन शैक्षणिक धोरणात तीन भाषा शिकण्याची संधी दिली आहे. तीन भाषा शिकणं अनिवार्य आहे. या तीन भाषांपैकी दोन भाषा भारतीयच असल्या पाहिजेत असा नियम आहे. त्यामुळे दोन भारतीय भाषांमध्ये एक मराठी आपण अनिवार्य केली आहे. दुसरी भाषा कोणती? तर ती कुठलीही भारतातील भाषा घेतली तर ती हिंदी, तमिळ, मल्याळम, गुजराती किंवा इतर कुठली तरी घ्यावी लागेल. याच्या बाहेरची तर घेता येणार नाही.”

“ज्यावेळेस समितीने मंत्र्‍यांच्या अध्यक्षतेखालील कमिटीकडे रिपोर्ट दिला, त्यामध्ये तिसरी भाषा जर हिंदी ठेवली तर त्याचे शिक्षक आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यातून अधिकच्या शिक्षकांची आवश्यकता पडणार नाही. इतर भाषा ठेवली तर त्याचे शिक्षक उपलब्ध नाहीत, ही त्यांची शिफारस आहे. यामध्ये कुठेही अतिक्रमण नाही,” असे फडणवीस पुढे बोलताना म्हणाले.

हिंदी सोडून इतर भाषाही शिकता येणार

फडणवी हिंदी सोडून इतर भाषा शिकण्याबद्दल बोलताना म्हणाले की, “जर कोणाला हिंदीच्या व्यतिरिक्त इतर भाषा शिकायची असेल तर ती शिकायची पूर्ण मुभा आम्ही देऊ. कारण तशी मुभा नवीन शैक्षणिक धोरणाने दिली आहे. मात्र किमान २० विद्यार्थी असले तर त्याला शिक्षक देता येईल, पण त्यापेक्षा कमी विद्यार्थी असले तर मात्र ऑनलाईन किंवा वेगळ्या पद्धतीने ती भाषा शिकवावी लागेल. आपल्या सीमावर्ती भागात असे शिक्षकही उपलब्ध असतात आणि अशी द्विभाषा पद्धत देखील असते. पण हिंदी लादण्याचा प्रयत्न होतोय म्हणणं चुकीचं आहे. महाराष्ट्रात मराठीचीच सक्ती असणार आहे. इतर कुठलीही सक्ती नाही.”

इंग्रजीचे मात्र गोडवे गातो…

“मला आश्चर्य वाटतं की हिंदीसारख्या भारतीय भाषेला आपण विरोध करतो आणि इंग्रजीचे मात्र गोडवे गातो. इंग्रजी खांद्यावर घेऊन मिरवतो. आपल्याला इंग्रजी जवळची आणि भारतीय भाषा दूरची ही का वाटते याचाही विचार केला पाहिजे,” असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.