Devendra Fadnavis : कर्मवीर मारोतराव कन्नमवार यांची आज १२५ वी जयंती आहे. या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. मारोतराव कन्नमवार यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजक भाजपाचे आमदार किशोर जोरगेवार होते. तसेच या कार्यक्रमासाठी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह आदी नेते उपस्थित होते. मात्र, या कार्यक्रमात भाजपाचे नेते तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित नव्हते. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, कर्मवीर कन्नमवार यांच्या १२५ व्या जयंतीच्या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूर जिल्ह्यासह विविध विषयांवर भाष्य केलं. तसेच “आम्ही ‘वार’ आडनाव असलेल्या लोकांचा नेहमी सन्मान करतो”, असं म्हणत फडणवीस यांनी मुनगंटीवार, वडेट्टीवार, जोरगेवार यांच्या नावाचा उल्लेख केला.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“मला माहिती आहे की चंद्रपूर हा जिल्हा वाघ आणि ‘वारां’चा जिल्हा आहे. सुधीर मुनगंटीवार हे आमचे नेते आहेत, तसेच विजय वडेट्टीवार आणि किशोर जोरगेवार हे आमचे मित्र आहेत. त्यामुळे मी सांगतो की कुठलेही ‘वार’ असले तरी आम्ही त्यांचा सन्मान करतो. कारण आम्ही हेडगेवारांचे अनुयायी आहोत. त्यामुळे ‘वार’ हे आडनाव आल्याबरोबर आमचे हात नेहमी पुढे असतात”, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.
हेही वाचा : सुरेश धस यांचं वक्तव्य; “मुन्नी म्हणजे राष्ट्रवादीतला एक पुरुष, त्या मुन्नीने कुठेही चर्चेला यावं, मी…”
“कर्मवीर मारोतराव कन्नमवार यांनी जास्त शिक्षण न घेताही त्यांनी आपलं व्यक्तिमत्व तयार केलं. महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळक यांचा एक मोठा पगडा कन्नमवार यांच्यावर होता. त्या विचारातून त्यांचं नेतृत्व तयार होत गेलं. त्या काळात ते वेगवेगळ्या आंदोलनात सहभागी झाले, त्यांनी कॉग्रेसचं काम सुरु केलं. आपलं जे ध्येय आहे ते पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला शांत बसता येणार नाही, अशा प्रकारची ती सर्व मंडळी होती. त्यामुळे त्यांनी एक मोठं संघटन उभं केलं. ज्या वेळी संयुक्त महाराष्ट्र तयार झाला तेव्हा संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? असा प्रश्न होता तेव्हा विदर्भातील ५४ आमदारांचं मत होतं की आताच वेळ आहे. आपण आताच वेगळ्या विदर्भासाठी मागणी करू. मात्र, तेव्हा कन्नमवार यांनी भूमिका घेतली की आता ही वेळ नाही. आता आपण महाराष्ट्र एकत्रित केला पाहिजे. आपल्याला महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे. मग तेव्हा यशवंतराव चव्हाण यांच्या पाठिमागे आपण उभं राहिलं पाहिजे. त्यामुळे कन्नमवार यांच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण यांना त्या काळात एक मोठं पाठबळ मिळालं”, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.