Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या प्रगतीसाठी प्रशासनाला १०० दिवसांचा आराखडा दिलेला आहे. या आराखड्याच्या माध्यमातून प्रशासनाने ठोस कामगिरी करावी हा यामागचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. यासंदर्भात कामाच्या नुसत्या घोषणा नाही तर १०० दिवसांत रिपोर्ट कार्ड देणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं होतं. दरम्यान, १०० दिवसांत रिपोर्ट कार्ड मागचा नेमका हेतू काय आहे? यामुळे नेमकं काय फायदा होणार आहे? याविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर माहिती सांगितली आहे. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी आज घेतलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी १०० दिवसांत रिपोर्ट कार्ड देण्याच्या मागील काय कारणं आहेत? या विषयी भूमिका मांडली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
तीन पक्ष एकत्रित असल्यानंतर प्रशासनामध्ये तुम्हाला किती मोठं आव्हान आहे असं वाटतं? असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही गेले अडीच वर्ष तीन पक्षाचं सरकार चालवलं. आताही तीन पक्षाचं सरकार चालवत आहोत. अनेक महत्वाचे निर्णय घेत आहोत. त्यामुळे मला वाटत नाही की प्रशासनामध्ये त्या काही अडचणी येतात. प्रशासनासाठी आमची लाईन फार स्पष्ट आहे. कारण आमचं धोरणावर फार दुमत नाही, म्हणजे मला एक धोरण हवं आहे आणि मग शिवसेना, राष्ट्रवादीला दुसरं धोरण हवं असं काही नाही”, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
“आमचं वेगवेगळ्या विषयांवर दुमत असू शकतं, एखाद्या व्यक्तीवर दुमत असू शकतं, पण धोरणावर नाही. त्यामुळे धोरणाची एक दिशा सर्व विभागांना दिलेली आहे. १०० दिवसांचा कार्यक्रम आम्ही प्रत्येक विभागाला दिला आहे. तसेच प्रत्येक विभागाचं आम्ही सादरीकरण घेणार आहोत. त्यांना त्याचे टार्गेट देखील दिलेले आहेत आणि ते विभाग टार्गेट पूर्ण करण्याचं काम करत आहेत. आमच्या सरकारमधील काही मंत्री देखील त्यावर लक्ष ठेवून आहोत. त्यात कुठेही अडचण नाही. त्यामध्ये आमचा प्रयत्न असा आहे की १०० टक्के टार्गेट पूर्ण झालं पाहिजे. आम्ही १०० दिवसांचा कार्यक्रम दिलेला आहे, त्याबाबत १५ एप्रिलपर्यंत काय करायचं? ते आम्ही सर्व विभागांना सांगितलं आहे. त्यामधील काय टार्गेट पूर्ण केलं याचा एक रिपोर्ट आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत”, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
वर्षा निवासस्थानाबाबत फडणवीस काय म्हणाले?
सध्या वर्षा या निवासस्थानाबाबत अनेक चर्चा सुरु आहेत. नक्की काय आहे? असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, “मला असं वाटतं की अलिकडच्या काळात काही बाबतीत मीडिया वेड्यांचा बाजार होतोय. माफ करा, पण स्पष्ट सांगतो. आज मी एका माध्यमांवर पाहतो होतो की वर्षा पाडणार? काय वेड्यांचा बाजार आहे? वर्षा ही काय कोणाच्या घरची मालमत्ता आहे का? असं आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थान सोडल्यानंतर त्या ठिकाणी मला जायचं आहे. पण त्यापूर्वी त्या ठिकाणी काही छोटी-मोठी कामे सुरु होती. दरम्यानच्या काळातच माझी मुलगी १० वीत आहे. १७ तारखेपासून तीची परीक्षा सुरु आहे. त्यामुळे ती म्हणाली की माझी परीक्षा झाल्यानंतर आपण तिकडे शिफ्ट होऊ. त्यामुळे मी वर्षा निवासस्थानावर सध्या शिफ्ट झालो नाही. मुलीची परीक्षा झाल्यानंतर मी वर्षा या निवासस्थानावर शिफ्ट होणार आहे. मात्र, सध्या एवढ्या वेढ्यासारख्या चर्चा सुरु आहेत. मला तर वाटतं की माझ्या सारख्या माणसांने यावर उत्तरही देऊ नये”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
© IE Online Media Services (P) Ltd