Devendra Fadnavis On Chhava : लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असून महाराष्ट्रातील अनेक भागात ‘छावा’चे शो हाऊसफुल होत आहेत. यादरम्यान राज्यात हा चित्रपट करमुक्त केला जावा अशी मागणी केली जात आहे. यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीबद्दल महत्त्वाचे विधान केले आहे. यावेळी फडणवीस यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाची गाथा चित्रपटाच्या माध्यमातून दाखवल्याबद्दल चित्रपट निर्मात्यांचे अभिनंदनही केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छावा या चित्रपटाबद्दल बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “मला एका गोष्टीचा आनंद आहे की, छत्रपती संभाजी महाराज ज्यांचं शौर्य, विरता आणि विद्वत्ता प्रचंड होती, पण इतिहासाने त्यांच्यावर मोठा अन्याय केला. ज्यांच्याबद्दल ‘देश धरम पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था। महा पराक्रमी परम प्रतापी, एक ही शंभू राजा था’, असं म्हटलं गेलं त्यांच्यावर अतिशय चांगला, इतिहासाशी कुठलीही प्रतारणा न करता ऐतिहासिक असा सिनेमा तयार झाला आहे. त्याबद्दल सिनेमाचे निर्माते, निर्देशक आणि प्रमुख भूमिका करणारे विकी कौशल यांचे मानापासून अभिनंदन करतो.”

छावा टॅक्स फ्री करण्याची मागणी

चित्रपट करमुक्त करण्याच्या मुद्द्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, “मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे की, हा सिनेमा टॅक्स फ्री करा. पण मी महाराष्ट्रातील जनतेला सांगू इच्छितो की, इतर राज्य जेव्हा चित्रपट टॅक्स फ्री करतात तेव्हा जो करमणूक कर असतो तो माफ केला जातो. महाराष्टाने २०१७ सालीच निर्णय घेतला आणि महाराष्ट्रात करमणूक कर हा नेहमी‍करिता रद्द केला आहे. आपल्याकडे (महाराष्ट्रात) करमणूक कर नाही. त्यामुळे अशी माफी देण्यासाठी असा करच आपल्याकडे नाही,” असे फडणवीस म्हणाले.

तसेच त्यांनी या चित्रपटाच्या प्रमोशनकरिता किंवा छत्रपती शंभू राजेंचा इतिहास हा प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचवण्यासाठी आपल्याला अधिक काय चांगलं करता येईल ते आपण करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा अपमान करणार्‍या अभिनेत्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर बोलताना फडणवीस म्हणाले की, “अपमान करणाऱ्यांना त्यांची जागा आम्ही दाखवू, अशा प्रकारे कोणी वागत असेल तर सरकारही माफ करणार नाही आणि शिवप्रेमीही माफ करणार नाहीत”.

छत्रपती होते म्हणून…

आज (१९ फेब्रुवारी) रोजी साजरा होत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देखील फडणवीस यांनी दिल्या. ते म्हणाले की, “केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर जगभरातील शिवप्रेमींना छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. छत्रपती होते म्हणून आम्ही आहोत. छत्रपतींनी आम्हाला आत्माभिमान दिला, आत्मतेज दिलं. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आम्हाला समतेचा संदेश दिला. १८ पगड जातींना एकत्रित करून ज्या स्वराज्याची त्यांनी स्थापना केली त्या स्वराज्यातून एकतेचा संदेश त्यांनी आम्हाला दिला. राज्यकारभार कसा चालवला पाहिजे हे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांनी आम्हाला शिकवलं. वनसंवर्धन, जलसंवर्धन कसं केलं पाहिजे हे शिवरायांनी शिकवलं. करप्रणाली कशी असली पाहिजे, सुरक्षा, समुद्री सुरक्षा कशी ठेवली पाहिजे हे महाराजांनी आम्हाला शिकवलं”.

“या सर्व आज्ञावलींचे पालन करत असताना पहिल्यांदा मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिला. फारसी भाषेचे शब्द वगळून सगळ्या आज्ञावली मराठी भाषेत करण्याचे काम महाराजांनी आम्हाला दिलं, शिवरायांचे मावळे म्हणूनच आम्ही राज्यकारभार आम्ही करत आहोत,” असेही फडणवीस यावेळी म्हणाले.