CM Devendra Fadnavis on Meeting Raj Thackeray : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीमागचं कारण सांगितलं आहे. ही भेट राजकीय नव्हती असं फडणवीस म्हणाले आहेत.
फडणवीस काय म्हणाले?
राज ठाकरे यांची भेट घेतल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “ही कुठलीही राजकीय भेट नाही, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरे यांचा अभिनंदनाचा फोन आला, तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की मी घरी येईन, त्याप्रमाणे मी घरी गेलो होते. ब्रेकफास्ट केला गप्पा मारल्या. या बैठकीचा कुठलाही राजकीय संदर्भ नाही. केवळ मैत्रीकरिता मी त्यांच्या घरी गेलो होते.”
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा ऐतिहासिक विजय झाला. या विजयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संशय व्यक्त केला होता. त्यानतंर मनसे-महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण सुरू झाले. यादरम्यान आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी आज शिवतीर्थावर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या. या दोन प्रमुख नेत्यांची सुमारे तासभर तरी बंद दाराआड चर्चा झाली.
देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची आज सदिच्छा भेट झाली – संदिप देशपांडे
मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीसांची भेट झाली नव्हती. आजची भेट ही सदिच्छा भेट होती, यामध्ये राजकीय असं काही नव्हतं, अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींबद्दल काही चर्चा झाली का? या बद्दल विचारले असता देशपांडे म्हणाले की, आज काय बोलणं झालं याची मला कल्पना नाही. आजची भेट राजकीय नव्हती सदिच्छा भेट होती. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचे जुने संबंध आहेत. दोन्ही नेत्यांच्या राजकीय भूमिका वेगळ्या असू शकतात पण राजकारण्यांचे वैयक्तिक संबंध असतात, असेही संदीप देशपांडे म्हणाले.