Devendra Fadnavis On Raj Thackeray and Uddhav Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणात मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चांनी जोर धरला आहे. या चर्चा मागचं कारण म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाबरोबर युतीच्या संदर्भात एका मुलाखतीत बोलताना मोठं भाष्य केलं. तसेच मराठी माणसांच्या अस्तित्त्वासाठी आमच्यातील वाद किरकोळ असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं. त्यावर उद्धव ठाकरे यांनीही आपणही किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार असल्याची भूमिका मांडत एक प्रकारे राज ठाकरे यांच्या प्रतिक्रियेला प्रतिसाद दिला. त्यामुळे मनसे आणि ठाकरे गट एकत्र येणार का? याबाबत आता वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चांवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘दोन्ही ठाकरे जर एकत्र आले तर आम्हाला आनंदच होईल’, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
मराठीच्या मुद्यांवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची शक्यता आहे, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारला. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “दोन्ही ठाकरे जर एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे. कोणीही आपल्यातील मतभेद विसरून एकत्र येत असेल तर यामध्ये काहीही वाईट वाटण्याचं कारण नाही”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
“फक्त मला असं वाटतं की आमचे माध्यमं जे आहेत, ते त्यावर जरा जास्त विचार करत आहेत. त्यामुळे वाट पाहा, दोन्ही ठाकरे एकत्र आले तर आम्ही स्वागत करू. ऑफर देणारे हे, त्यानंतर त्यावर प्रतिसाद देणारे आणि अटी ठेवणारेही तेच. त्यावर मी काय बोलणार? त्यामुळे याबाबत मला जास्त विचारण्यापेक्षा त्यांनाच विचारलं पाहिजे”, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
अजित पवारांनी मनसे-ठाकरे गटाच्या युतीबाबत काय म्हटलं?
“मनसे अध्यक्ष म्हणून राज ठाकरे हे स्वत: काम करतात. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे हे काम करतात. त्यामुळे त्यांनी त्यांच्या दोन्ही पक्षाबाबत काय भूमिका घ्यावी हा प्रश्न त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं की नाही यावं? हे आम्ही दुसऱ्या कोणत्या राजकीय पक्षांने सांगण्याचं काही कारण नाही. माझं मत एवढंच आहे की प्रत्येकाने आपल्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून जे जे त्यांना योग्य वाटतं तो निर्णय त्यांनी घ्यावा’, असं अजित पवार म्हणाले आहेत.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?
“एकनाथ शिंदेंचं राजकारण वेगळं आणि मी शिवसेनेतून बाहेर पडलो, हे वेगळं आहे. आमदार तेव्हा माझ्याकडेही आले होते. हे मलाही (एकनाथ शिंदेंच्या बंडासारखं) तेव्हा सहज शक्य होतं. पण बाळासाहेब ठाकरे सोडून मी कोणाच्याही हाताखाली काम नाही करणार हा माझा विचार होता. मी बाहेर पडलो त्यावेळेचा हा माझा विचार आहे. पण मी शिवसेनेत होतो तेव्हा उद्धव ठाकरे यांच्याबरोबर काम करायला मला काहीच हरकत नव्हती. पण समोरच्याच्या मनात आहे का? मी त्यांच्याबरोबर काम करावं? महाराष्ट्राची इच्छा असेल तर महाराष्ट्राने जाऊन सांगावं. अशा लहान-मोठ्या गोष्टींत मी माझा इगो आणत नाही”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं.
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर एकत्र येण्यासंदर्भात मांडलेल्या भूमिकेबाबत उद्धव ठाकरे म्हणाले होते की, “किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मीही तयार आहे. सर्व मराठी माणसांच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय. पण माझी अट एक आहे. जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो, तेव्हाच जर विरोध केला असता तर हे सरकार तिकडे बसलं नसतं. महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार केंद्रात बसवलं असतं. त्याचवेळेला हे काळे कामगार कायदे फेकून दिले असते. पण तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा. मग तडजोड करायची, हे असं चालणार नाही. महाराष्ट्राच्या हिताच्या आडवं जो कोणी येईल, त्याचं स्वागत मी करणार नाही. त्याला घरी बोलावणार नाही, त्याचं आदरातिथ्य करणार नाही. त्याच्याबरोबर पंगतीला बसणार नाही हे ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
© IE Online Media Services (P) Ltd