Devendra Fadnavis on Nagpur Voilence: सोमवारी दोन गटांत निर्माण झालेल्या तणावामुळे नागपूरमध्ये दंगल झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये अनेक वाहनांची जाळपोळ करण्यात आली. तसेच, या दंगलीत तब्बल ३३ पोलीस जखमी झाले असून त्यात तीन डीसीपी दर्जाचे अधिकारी असल्याची बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज यासंदर्भात विधानसभेत केलेल्या निवेदनात अधोरेखित केली. यावेळी नागपूरमध्ये घडलेल्या दंगलीमध्ये एक सुनियोजित पॅटर्न दिसून येत असल्याचं सूचक विधान देवेंद्र फडणवीसांनी केलं.
डीसीपींवर कुऱ्हाडीनं वार
नागपूर दंगलीमध्ये तीन डीसीपी जखमी झाले असून त्यातील एकावर चक्क कुऱ्हाडीनं वार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यावर फडणवीसांनी विधानसभेत निवेदन देताना इशारा दिला आहे. पोलिसांवर हल्ला करणारे जे कुणी असतील, त्यांना सोडणार नाही, असं देवेंद्र फडणवीस विधानसभेत म्हणाले आहेत.
“या घटनेत एक क्रेन, दोन जेसीबी व काही चारचाकी वाहने जाळण्यात आली. या संपूर्ण घटनेत ३३ पोलीस जखमी झाले आहेत. त्यात तीन उपायुक्त दर्जाचे पोलीस आहेत. त्यातल्या एका उपायुक्तावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला आहे. एकूण ५ नागरिक जखमी झाले आहेत. तिघांवर उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे. दोन रुग्णालयात आहेत. त्यापैकी एक आयसीयूत आहे”, अशी माहिती फडणवीसांनी दिली.
“एकूण तीन गुन्हे गणेशपेठ पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. तहसील पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. असे एकूण पाच गुन्हे आहेत. ११ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. एंट्री पॉइंटवर नाकाबंदी करण्यात आली आहे. त्यात तहसील, कोतवाली, गणेशपेठ, पाचपावली, लकडगंज, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोदरानगर, कपिलनगर या पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. एसआरपीएफच्या पाच तुकड्या इथे तैनात करण्यात आल्या आहेत”, असंही फडणवीसांनी नमूद केलं.
नागपूर दंगल पूर्वनियोजित कट?
दरम्यान, नागपूरमधील प्रकार हा सुनियोजित पद्धतीने घडल्याचा दावा देवेंद्र फडणवीसांनी यावेळी केला. “सकाळची एक घटना घडल्यानंतर पूर्णपणे शांतता होती. त्यानंतर संध्याकाळी काही लोकांनी जाणीवपूर्वक असा हल्ला केल्याचं समोर येतंय. कारण जवळपास एक ट्रॉलीभरून दगड सापडले आहेत. काही लोकांनी घरांवर जमा करून ठेवलेले दगड पाहायला मिळाले. शस्त्रंही मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आली आहे. वाहनांची जाळपोळ झाली आहे. ठरवून काही ठराविक घरांना, आस्थापनांना लक्ष्य करण्यात आलं आहे. त्यामुळे यात काही लोकांचा सुनियोजित पॅटर्न दिसतोय”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
“अशा लोकांवर कारवाई केली जाईल. कोणत्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था हाती घेण्याची कुणालाही परवानगी दिली जाणार नाही. एक नक्की सांगतो, पोलिसांवर ज्यांनी कुणी हल्ला केला असेल, त्यांना काहीही झालं तरी सोडलं जाणार नाही. पोलिसांवरचा हल्ला सहन केला जाणार नाही. पोलीस शांतता प्रस्थापित करत होते. अशा वेळी पोलिसांवर केलेला हल्ला चुकीचा आहे. महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था राखणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. मी सर्व जनतेला विनंती करू इच्छितो की सर्व समाजांचे धार्मिक सण या काळात चालले आहेत. अशा परिस्थितीत सगळ्यांनी संयम ठेवायला हवा. अशा वेळी आपल्याला कायदा व सुव्यवस्था कशी राखता येईल, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा”, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.