Devendra Fadnavis On Nashik Violence : नाशिक शहरात अनधिकृत धार्मिक स्थळावरील कारवाई दरम्यान झालेल्या दंगलीत जमावाने पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना घडली होती. या घटनेत काही पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले होते. तसेच यामध्ये अनेक वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. दंगलीनंतर पुन्हा कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. दरम्यान, सध्या या भागात शांतता आहे.
नाशिकमधील या दंगल प्रकरणावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. नाशिकमध्ये जाणीवपूर्वक दंगल घडवण्यात आली असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. तसेच दंगलखोरांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“नाशिकमध्ये ज्या प्रकारे दंगल घडवण्याचा प्रयत्न झालेला आहे, न्यायालयाच्या निर्णयानंतर तेथील लोकांनी स्वत: तेथील अतिक्रमण काढण्याच्या संदर्भात पोलिसांना सांगितलं होतं. तसेच ते अतिक्रमण काढण्याची सुरुवातही त्यांनी स्वत: केली होती. मात्र, त्याचवेळी काही मंडळींनी जाणीवपूर्वक दगडफेक केली, जाणीवपूर्वक दंगा तयार केला. त्यामुळे आता त्या संदर्भात कडक कारवाई करण्यात येत आहे”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
नाशिकमध्ये नेमकं काय घडलं होतं?
नाशिक शहरातील अनधिकृत धार्मिक बांधकामावरील अतिक्रमण काढण्याच्या कारवाई दरम्यान दंगल उसळली होती. जमावाने दगडफेक केली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं, तर काहीजण जखमी झाले होते. यामुळे नाशिकमध्ये तणाव निर्माण झाला होता. धार्मिक बांधकामावरील कारवाईला विरोध करत जमावाने मंगळवारी मध्यरात्री नागजी चौक आणि उस्मानीचा चौक परिसरात मोठा गोंधळ घातला होता. तसेच दगडफेक केली होती. यामध्ये काही पोलीस देखील जखमी झाले होते.
त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बळाचा वापर केला होता. या प्रकरणी जमावाविरोधात पोलिसांवर हल्ला करणे, शस्त्र बाळगणे यासह आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. यानंतर या प्रकरणात ३१ संशयितांना अटक करण्यात आली होती. तसेच न्यायालयाने ३० संशयितांना १९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे.