Devendra Fadnavis On Pune Shivshahi Bus Rape Case Update : पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेवर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला आज (२८ फेब्रुवारी) पुणे पोलिसांनी अटक केलं आहे. आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक करण्यासाठी पोलिसांनी ड्रोन कॅमेऱ्याचाही वापर केला. अखेर आज आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपी दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी अटक केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देत महत्वाची माहिती सांगितली आहे. तसेच आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केला का? पोलिसांनी आरोपीला कसं शोधून काढलं? तसेच या प्रकरणातील कोण-कोणत्या डिटेल्स आतापर्यंत समोर आल्या आहेत? यावर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला अटक केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची माहिती दिली आहे. फडणवीस म्हणाले की, “आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक करण्यात आलं आहे. आरोपी लपून बसलेला होता. पण पोलिसांनी वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करत आरोपीला शोधून काढलं. तसेच लवकरच या संपूर्ण घटनेचा पर्दाफाश होईल. या घटनेबाबतची काही माहिती पोलीस आयुक्तांनी दिली. या घटनेबाबतची काही माहिती आता देणं योग्य नाही, योग्य स्टेजला आल्यानंतर ती माहिती दिली जाईल. मात्र, या घटनेचा घटनाक्रम काय? याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केला का?

आरोपी दत्तात्रय गाडे याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, “असं आहे की या प्रकरणातील सर्व गोष्टी तपासात समोर आल्यानंतर त्यावर सविस्तर बोलणं योग्य आहे. आता पोलिसांनी आरोपीला अटक केलं आहे. त्यानंतर आरोपीला आज न्यायालयात हजर केलं जाईल. त्यानंतर आरोपीची चौकशी होईल. तसेच काही टेक्निकल डिटेल्स आमच्याकडे आलेल्या आहेत. तसेच काही फॉरेन्सिक डिटेल्स देखील आलेल्या आहेत. याची सर्व माहिती एकत्र करून याबाबत बोलणं योग्य राहील”, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

मुख्यमंत्र्यांकडून योगेश कदमांची पाठराखण

पुण्यातील स्वारगेट बस आगारात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली असताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी याबाबत असंवेदनशील विधान केले होते. शिवशाही बसमध्ये जी घटना घडली त्यात कुठेही पीडितेकडून प्रतिकार झाला नाही. त्यावेळी बसच्या आजूबाजूला काही लोक उभे होते. पण प्रतिकार न झाल्यामुळे याबाबत कुणाला शंका आली नाही, असे विधान गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केले होते. या विधानानंतर विरोधकांनी टीकेची राळ उठवली. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत आपली भूमिका मांडत. नव्या मंत्र्यांना एक सल्ला दिला आहे. यावेळी फडणवीस म्हणाले, “योगेश कदम यांच्या विधानाला वेगळ्या पद्धतीने घेतले गेले. स्वारगेट आगार हा गर्दीचा परिसर आहे. तिथे अनेक लोक होते. गुन्हा घडलेली बस बाहेरच होती. पण लोकांना प्रतिकार होताना लक्षात आला नाही, असे सांगण्याचा योगेश कदम यांचा प्रयत्न होता. तथापि, कदम नवीन मंत्री आहेत. त्यामुळे माझ्या त्यांना सल्ला असेल की, अशा प्रकरणात बोलताना आपल्याला अधिक संवेदनशील राहून बोलावे लागेल. कारण बोलताना काही चूक झाली तर त्याचा समाजमनावर चुकीचा परिणाम होतो.”