Santosh Deshmukh Case : गेल्या काही दिवसांपासून बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण चर्चेत आहे. संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. या घटनेनंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. या घटनेचे पडसाद विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही उमटले. तसेच या प्रकरणावर सर्वच स्तरातून तीव्र पडसाद उमटले आहेत. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबाबत सभागृहात निवेदन दिलं. यावेळी सरपंच संतोष देशमुख हत्या कशी झाली? यात कोणाचा सहभाग आहे? या प्रकरणामागणी पार्श्वभूमीवर काय? यासह सविस्तर घटनाक्रमाची माहिती सांगितली. तसेच गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. तसेच बीडमधील पोलीस अधीक्षकांची बदली करण्यात आल्याचे आदेश दिल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बोलताना फडणवीस म्हणाले, “हे संपूर्ण प्रकरण गंभीर आहे. या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढवी लागणार आहेत. या प्रकरणाची पार्श्वभूमी आपण पाहिली तर एका कंपनीने पवनचक्कीमध्ये गुंतवणूक केली आहे. मात्र, काही लोक यासंदर्भातील कामे आम्हाला द्या किंवा आम्हाला खंडणी द्या अशा परिस्थितीत वावरताना दिसतात. ६ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० च्या दरम्यान पवन चक्कीच्या कंपनीचं ऑफीस असलेल्या ठिकाणी या घटनेतील आरोपी गेले. त्यानंतर त्यांनी एका सुरक्षारक्षकाला आणि एका कंपनीच्या मॅनेजरला मारहाण केली. त्यानंतर मॅनेजरने तेथील सरपंचाना फोन केला. त्यानंतर सरपंच यांच्याबरोबर काही लोक आले मग त्यांनी त्या आलेल्या लोकांना बाचबाची केली. यानंतर ९ डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख हे त्यांच्या गाडीतून जात असताना काळ्या रंगाच्या दोन गाड्यांनी त्यांचा पाटलाग केला आणि संतोष देशमुख यांची गाडी थांबवून त्यांना मारहाण. त्यावेळी सरपंच संतोष देशमुख यांचा भाऊ हा आरोपी विष्णु चाटेच्या संपर्कात होता. तेव्हा आरोपी सांगत होता की १५ मिनिटात सोडतो. मात्र, त्यांनी संतोष देशमुख यांना सोडलं नाही आणि त्यानंतर मारहाणीत देशमुख यांचा मृत्यू झाला”, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितली.

हेही वाचा : Beed Sarpanch Murder Case: मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर सरपंच संतोष देशमुख यांच्या भावाची भावनिक प्रतिक्रिया; म्हणाले, “आता मला एकच…”

‘एसआयटी’ आणि न्यायालयीन चौकशी होणार

दरम्यान, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड कोणी असला तरी त्याला शिक्षा होईल. तसेच मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. तसेच सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी आयजी दर्जाच्या अधिकाऱ्यांसह एसआयटीच्या माध्यमातून आणि न्यायालयीन चौकशी करण्यात येणार असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

पोलीस अधीक्षकांची बदली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातील माहिती दिली. तसेच यावेळी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांची बदली करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

Story img Loader