Devendra Fadnavis On Santosh Deshmukh Case : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी हत्या करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केलं आहे. या संपू्र्ण प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटीकडून करण्यात येत आहे. मात्र, तपास यंत्रणांतील अधिकाऱ्यांवरून अनेकदा आरोप-प्रत्यारोप झाले, त्यामुळे तपासातील काही अधिकारी बदलण्यात आले. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी विरोधक करत असून यावरून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपासाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची माहिती दिली. तसेच या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होणार की नाही? याबाबतही त्यांनी भाष्य केलं. तसेच ‘तपासामध्ये अनेक गोष्टी गोपनीय ठेवूनच तपास केला जातो. त्यामुळे आपण तपास यंत्रणांवर दबाव न आणता तपास करू दिलं पाहिजे’, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेतील तपासाबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, “आपण तपास यंत्रणांना व्यवस्थित तपास करू दिला पाहिजे. तपासातील सर्व गोष्टी तपास यंत्रणा बाहेर माहिती सांगू शकत नाहीत. तपासामध्ये गोष्टी गोपनीय ठेवूनच तपास केला जातो. मला असं वाटतं की कुठल्याही प्रकारे तपास यंत्रणांवर दबाव न आणता तपास यंत्रणांना आपण काम करू दिलं पाहिजे. तसेच मी एवढंच आश्वासन देतो की कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही दोषी व्यक्तीला सोडलं जाणार नाही. तपास यंत्रणा योग्य तपास करतील”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होणार का?

संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होणार आहे का? या संदर्भातील माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, “बीडच्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांच्यासारखे एक वकील नियुक्त करण्यात यावेत अशी मागणी करण्यात येत आहे. या मागणीनंतर उज्ज्वल निकम यांना आम्ही विनंती केली आहे. ते सकारात्मक निर्णय घेतील असा विश्वास आहे. मात्र, उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे की, माझी नियुक्ती केल्यानंतर काही लोक विनाकारण राजकारण करतात. राजकीय रंग देण्याचं काम करतात, हे योग्य वाटत नाही. खरं तर देशात अनेक वकील आहेत. वेगवेगळ्या पक्षात आहेत किंवा त्यांनी वेगवेगळ्या निवडणुका लढवलेल्या आहेत. मात्र, त्यांच्याबाबत राजकारण होत नाही. आता उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीवर राजकारण करणं हे कुठेतरी गुन्हेगारांना मदत करण्यासारखं आहे. उज्ज्वल निकम यांचा आजपर्यंतचा इतिहास आहे की त्यांनी एखादी केस घेतली तर गुन्हेगाराला शिक्षा होतेच”, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

अजित पवार काय म्हणाले?

संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं की, “सीआयडी एसआयटी या यंत्रणांवर चौकशीची जबाबदारी दिलेली आहे. त्या यंत्रणांनी अतिशय चांगल्या प्रकारे चौकशी करावी. कोणाच्याही दबावाला बळी पडू नये, अशा स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. आता वेगवेगळे लोक वेगवेगळी माहिती देतात. ही माहिती दिल्यानंतर एसआयटी, सीआयडी आणि न्यायालयीन समितीच्या माध्यमातून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे”, असं अजित पवार यांनी म्हटलं.

Story img Loader