Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळातील काही निर्णयांना स्थगिती दिल्याची व त्यांच्या कार्यकाळातील कामांची चौकशी सुरू करण्यात आल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात आहे. तसेच तानाजी सावंत यांच्या कार्यकाळातील तब्बल ३१९० कोटींच्या कामांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याचंही बोललं जातं. आता या चर्चांवर आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करत या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. तसेच विकास कामांना स्थगिती द्यायला मी काय उद्धव ठाकरे आहे का? असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

देवेद्र फडणवीस काय म्हणाले?

“महायुती सरकार सत्तेत आल्यापासून आपण १०० दिवसांचं मिशन हातात घेतलं. तालुक्याच्या पातळीवरील कार्यालय आहेत, त्यांना आपण सात प्रकारच्या गोष्टी सांगितल्या. तेथील कार्यालयातील रेकॉर्ड, लोकांना भेटण्याच्या वेळा यासह वेगवेगळे सात कामे आपण त्यांना दिले. त्यांना आपण एक टार्गेट दिलं, काय-काय काम करायचं? तसेच १०० दिवसांच्या निकषावर किती काम केली याचा आढावा देखील आम्ही घेत आहोत. १०० दिवसांच्या कामाचं प्रत्येक विभागाने एक टार्गेट फायनल केलं आहे. तसेच याचं प्रेझेंटेशन देखील त्यांनी केलं आहे, यामध्ये ज्यांनी उत्तम काम केलं आहे, त्यांचा सत्कार सरकार करेल. यातील अनेक विभागांनी खूप चांगले काम केलं. आता एक नवीन कल्चर आणण्याचा प्रयत्न करत आहोत”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

“गेल्या काही दिवसांपासून माध्यमांची एक आवडती बातमी झाली आहे. काही झालं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांच्या कामांना स्थगिती दिली. पहिल्यांदा हे लक्षात घेतलं पाहिजे की, कामांना स्थगिती देण्यासाठी मी काही उद्धव ठाकरे नाही. याआधीही मी स्पष्ट केलं आहे की जे राज्याच्या हिताचं आहे ते काम सुरु करत असताना एकनाथ शिंदे यांच्याबरोबर मी देखील होतो, त्यानंतर अजित पवार हे देखील आले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात जे निर्णय घेतले, त्या निर्णयांची जबाबदारी फक्त एकनाथ शिंदे यांची नाही, तर आमच्या तिघांचीही जबाबदारी आहे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

“आता काही गोष्टी आम्हाला आढळल्या आहेत की खालच्या स्थरावर गडबडी होतात. त्या-त्या ठिकाणी चर्चा करूनच स्थगिती दिलेली आहे. माझ्याकडे अनेक माहिती आहे. आता विभागीय आयुक्तांनी स्थगिती दिली तरी देवेंद्र फडणवीस यांचा दणका, संबंधित खात्याच्या मंत्र्‍यांनी त्यांच्या विभागातील कामांना केंद्र सरकारच्या निर्देशाने स्थगिती दिली तरी देखील देवेंद्र फडणवीसांनी शिंदेंच्या कार्यकाळातील कामांना स्थगिती दिली. मी एक गोष्ट माध्यमांना आणि विरोधकांनाही सांगतो. हे समन्वयाने चालणारं सरकार आहे. या सरकारमध्ये सर्व निर्णय आम्ही तिघंही मिळून घेतो. आता काही बैठकांना आम्ही तिघं असतो, काही बैठकीला मी असतो किंवा काही बैठकीला अजित पवार असतात. मग एखाद्या बैठकीला कोणी गैरहजर असलं की लगेच तो नाराज, मला असं वाटतं की सध्या कॉलिटीच्या बातम्याही दिसत नाहीत आणि विरोधकांना कॉलिटीची टीका करता येत नाहीये”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.