CM Devendra Fadnavis on Waghya Dog Memorial Raigad : रायगडावरील वाघ्या कुत्र्याचे स्मारक सध्या चर्चेत आले आहे. छत्रपती घराण्याचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी या वाघ्या कुत्र्याचे स्मारक रायगडावरून हटवण्यात यावं, अशी मागणी करणारं पत्र राज्य सरकारला दिलं आहे. यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी ३१ मे पर्यंतची मुदत देखील दिली आहे. दरम्यान, यानंतर धनगर समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी वाघ्या कुत्र्याचे स्मारक हटवण्यास विरोध दर्शविला आहे. यानंतर यासंदर्भात अनेक राजकीय नेत्यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिल्या. यादरम्यान या वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाबद्दल राज्य सरकारची नेमकी भूमिका काय ? याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

वाघ्या कुत्र्‍याच्या समाधीबाबत सर्वांनी एकत्र बसून चर्चेतून मार्ग काढला पाहिजे असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. “या संदर्भात सगळ्यांशी चर्चा करावी लागेल. कारण शेवटी त्याच्याकरिता पैसे होळकरांनी दिलेले आहेत. त्यामुळे तो असा कसा काढून टाकणार याबाबत मोठ्या प्रमाणात समाजाचा रोष देखील आहे. इतके वर्ष झाले त्या ठिकाणी तो वाघ्याच्या पुतळा किंवा समाधी आहे. त्यामुळे या प्रकरणात सर्वांशी चर्चा करून वाद न करता मार्ग निघू शकतो. प्रत्येक गोष्टीत वाद केलाच पाहिजे असं काही आहे का?” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

“वाद करण्याचं काही कारण नाही. सगळ्यांनी बसून मार्ग काढावा. उगाच दोन समाज एकमेकांसमोर उभे झालेले दिसतात… इकडे धनगर समाज वेगळा आणि इकडे मराठा समाज वेगळा असं काही नाही. सगळे समाज एकमेकांसोबतचे समाज आहेत. त्यामुळे या बाबतीत वाद करणं अयोग्य आहे, बसून मार्ग काढला पाहिजे,” असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

संभाजीराजेंना भेटीसाठी वेळ मिळत नाही

वाघ्या कुत्र्‍याच्या समाधीच्या मुद्द्यावर संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्‍यांची भेट घेण्यासाठी त्यांची वेळ मिळत नाही असे म्हटले होते. यावर देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. “मी त्यांना अनेक वेळा वेळ दिलेली आहे. पण त्यांना असं का वाटतं माहिती नाही. मी दरवेळेस त्यांना वेळ देतो. ते माझ्याशी फोनवरही बोलतात, मला येऊनही भेटतात. त्यामुळे वेळ न मिळण्याचं काही कारणच नाही.”