फडणवीस, पवार, उद्धव ठाकरेंचे पाठबळ, एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाशी चर्चा
कोल्हापूर : सीमाप्रश्नी महाराष्ट्र शासन उदासीन असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीने आंदोलनाचा पवित्रा घेताच शासन या प्रश्नी सक्रिय झाले आहे. सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी राज्य शासन सर्व सामर्थ्यांसह पाठपुरावा करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाला मुंबई येथे दिले. मुख्यमंत्री फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे अशा राज्यातील तीन प्रमुख नेत्यांचे एकाच वेळी पाठबळ मिळाल्याने सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीला गती येण्याची चिन्हेआहेत.
बेळगावसह सीमाभागाचा समावेश महाराष्ट्रात व्हावा, यासाठी सीमावासीयांच्या लढा सुरू आहे. हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र या कामी राज्य शासन प्रभावीपणे काम करताना दिसत नाही अशी सीमावासीयांची तक्रार आहे. गेल्या तीन दिवसांत सीमाप्रश्नाला महाराष्ट्रातील नेत्यांकडून अपेक्षित सहकार्य मिळाले.
अलीकडेच शरद पवार हे कोल्हापूरहून बेळगावला गेले असता महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यासमोर राज्य शासनाच्या तक्रारीचा पाढा वाचला. महाराष्ट्र सरकार आणि सीमावासीयांच्या समन्वयासाठी राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची समन्वयकमंत्री म्हणून नियुक्ती केली असली तरी गेल्या चार वर्षांत त्यांनी सीमाबांधवांबरोबर बैठकही घेण्यात आलेली नाही. सर्वोच्च न्यायालयातील दाव्यासंदर्भात महाराष्ट्र सरकारकडून अक्षम्य उदासीनता दिसून येत आहे. आता तरी महाराष्ट्र सरकारने मराठी भाषिक सीमाबांधवांसाठी तातडीने पावले उचलावीत. महाराष्ट्राची बाजू मांडणाऱ्या दोन वकिलांच्या निधनानंतर नवीन वकीलही नियुक्त केले नाहीत. यामुळे नवीन वकील नियुक्तीसाठी पाठपुरावा आवश्यक आहे.
न्यायालयातील बाजू मांडणाऱ्या ज्येष्ठ वकिलांशी समन्वयक साधावा. त्यासाठी एखाद्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, समन्वयकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उच्चाधिकार समितीची तातडीने बैठक घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. १० फेब्रुवारीपर्यंत आवश्यक उपाययोजना कराव्यात, अन्यथा ११ फेब्रुवारीपासून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता.
तत्परतेने हालचाली
या पाश्र्वभूमीवर तातडीने म्हणजे सोमवारी मुख्यमंत्र्यांना सीमाभागातील शिष्टमंडळासह भेटण्याची ग्वाही पवारांनी दिली. त्यानुसार काल रात्री एकीकरण समिती आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात बैठक झाली. फडणवीस यांनी ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांच्याशी याबाबत लवकरच चर्चा करणार असल्याचे सांगितले. उच्चाधिकार समिती आणि तज्ज्ञ समिती समवेत बैठक घेण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.?
शिवसेनेचे समर्थन
या बैठकीनंतर एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात राहून सीमाप्रश्नाचा पाठपुरावा करण्यात येईल, असे स्पष्ट केले. शिष्टमंडळात समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, मनोहर किणीकर, प्रकाश मरगाळे आदींचा समावेश होता.