Devendra Fadnavis on Ajit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. बीड जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेत असताना त्यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना समज देत असताना कुणीही पाया पडू नये, असं सांगितलं. तसेच माझं आई-वडिलांच्या आणि चुलत्याच्या कृपेने बरं चाललं आहे, असेही विधान केले. या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत बाबींबद्दलच्या चर्चांना तोंड फुटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही याबाबतचा प्रश्न विचारण्यात आल्यावर त्यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली.
काकांना आता मर्यादीत ठेवलं
अजित पवारांच्या विधानावर प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अजित पवार बरोबर म्हणाले. मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे असतात. काकांना त्यांनी आशीर्वादापुरतंच त्यांनी मर्यादित ठेवले आहे. हे तुम्ही लक्षात घ्या”
बीडच्या प्रश्नावर बोलणार नाही
भाजपा आमदार सुरेश धस यांनी दोन दिवसांपूर्वी बिश्नोई गँगचा उल्लेख करत त्यांना जिवे मारण्याची धमकी मिळाल्याचे सांगितले. यावर प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली नाराजी स्पष्ट केली. “मी अशा कोणत्याही विधानावर प्रतिक्रिया देणार नाही. बीडमध्ये रोज नवीन विधाने केली जातात. पण माझ्याकरिता बीडचे प्रकरण महत्त्वाचे होते. त्यात सीआयडीने योग्य तपास केला. आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रानुसार आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा मिळाली पाहिजे, याकडे आमचे लक्ष आहे.”
याबरोबरच मराठी भाषेचा अवमान करणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष सध्या आक्रमक झालेला आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मराठीचा आग्रह चुकीचा नाही. तो आग्रह कुणी धरत असेल तर ते योग्यच आहे. पण त्या आग्रहाकरिता जर कायदा हातात घेतला, तर कायदेशीर कारवाई होईलच.
दरम्यान, लोकसभेत आज सादर केलेल्या वक्फ सुधारणा विधेयकाचे त्यांनी समर्थन केले. हे विधेयक मंजूर होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. तसेच शिवसेना (ठाकरे) पक्षाची हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख यांच्या विचारांवर चालण्याची त्यांची तयारी असेल तर ते अजूनही वक्फ विधेयकाला पाठिंबा देतील. ज्या पक्षांचा विवेक शाबूत आहे, ते लोक कधीही या विधेयकाचा विरोध करणार नाहीत, असेही ते म्हणाले.