नागपूरमधील दंगलीच्या मुद्द्यावर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाल्याचं दिसून येत आहे. सोमवारी नागपूरमध्ये दोन गटांत झालेल्या दंगलीमध्ये तब्बल ३३ पोलीस जखमी झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत केलेल्या निवेदनात दिली. त्याचवेळी पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना काहीही झालं तरी सोडणार नाही? असा इशाराच देवेंद्र फडणवीसांनी दिला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी छावा चित्रपटाचा उल्लेख करत औरंगजेबाबद्दलचा संताप राज्यात व्यक्त होत असल्याचं नमूद केलं.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

नागपूर दंगलीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज विधिमंडळ अधिवेशनादरम्यान विधानसभेत सविस्तर निवेदन केलं. या निवेदनात सोमवारी नागपूरमध्ये दंगलग्रस्त भागात नेमकं काय घडलं? हिंसाचाराला कशी सुरुवात झाली? पोलिसांवर कशा प्रकारे हल्ले करण्यात आले? यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी छावा चित्रपटाचा त्यांनी केलेला उल्लेख सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

‘छावा’ चित्रपटाचा मुख्यमंत्र्यांनी केला उल्लेख!

नागपूर दंगलीबाबत माहिती देताना देवेंद्र फडणवीसांनी निवेदनाच्या शेवटी ‘छावा’ चित्रपटाचा उल्लेख केला. “मला कुठल्या चित्रपटावर टीका करायची नाहीये. आज महाराष्ट्रात ‘छावा’ या चित्रपटाने संभाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्यासमोर आणला. पण त्यानंतर राज्यात लोकांच्या भावनाही मोठ्या प्रमाणावर प्रज्वलित झाल्या आहेत. औरंगजेबाबद्दलचा रागही मोठ्या प्रमाणावर बाहेर येतोय. पण हे सगळं जरी असलं, तरी महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था राखणं अत्यंत महत्त्वाचं आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“सर्वांनी संयम बाळगला पाहिजे. इथली सामाजिक घडी व्यवस्थित राहिली, तर आपण ज्या प्रगतीच्या दिशेनं निघालो आहोत. त्या दिशेनं जाण्यास आपल्याला मदत होईल. पण चेतावनी देतो की कुणीही दंगा करण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा जात-धर्म न पाहता त्यांच्यावर कारवाई केली जाईल”, असं आवाहनही फडणवीसांनी यावेळी केलं.

नागपूरमधील दंगल पूर्वनियोजित कट?

दरम्यान, नागपूरमधील प्रकार हा सुनियोजित पद्धतीने घडल्याचा दावा देवेंद्र फडणवीसांनी यावेळी केला. “सकाळची एक घटना घडल्यानंतर पूर्णपणे शांतता होती. त्यानंतर संध्याकाळी काही लोकांनी जाणीवपूर्वक असा हल्ला केल्याचं समोर येतंय. कारण जवळपास एक ट्रॉलीभरून दगड सापडले आहेत. काही लोकांनी घरांवर जमा करून ठेवलेले दगड पाहायला मिळाले. शस्त्रंही मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आली आहे. वाहनांची जाळपोळ झाली आहे. ठरवून काही ठराविक घरांना, आस्थापनांना लक्ष्य करण्यात आलं आहे. त्यामुळे यात काही लोकांचा सुनियोजित पॅटर्न दिसतोय”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.