Devendra Fadnavis वर्धा जिल्ह्यातील आर्वी या ठिकाणी विविध कामांचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाला पालकमंत्री पंकज भोयर, खासदार अमर काळे, आमदार सुमित वानखेडे यांच्यासह भाजपाचे दिग्गज उपस्थित होते. या कार्यक्रमात सुमित वानखेडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शायराना अंदाज पाहण्यास मिळाला.

सुमित वानखेडे यांनी काय म्हटलं?

“तुम आ गये हो तो चांदनीसी बात है, जमीन पर चांद कब रोज रोज उतरता है?” म्हणत सुमित वानखेडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं. तसंच सुमित वानखेडेंनी नंतर मिर्झा गालिब यांचाही शेर म्हटला. वो आये हमारे घरमें खुदा की कुदरत है, कभी हम उनको कभी अपने घर को देखते हैं. आज आपण आला आहात आमच्या मागण्यांचा विचार आपण नक्की कराल असंही सुमित वानखेडे म्हणाले. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलायला उभे राहिले. त्यांनीही खास शायराना अंदाजात सुमित वानखेडेंच्या शायरीला उत्तर दिलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“आजच्या कार्यक्रमात माझ्यासमोर एक पेच निर्माण झाला आहे. सुमित भाऊंनी, खासदारांनी, मंत्री महोदयांनी इतक्या मागण्या केल्या आहेत की सगळ्या मागण्या मान्य करायच्या तर बाकी आमदार म्हणतील सगळं इथेच देणार का? नाही केल्या तर सुमित भाऊंची इतकी शेरोशायरी झाली आहे की माझ्या भाषणानंतर ते म्हणतील, “वो आये मेरी मजार पर, मिट्टी झाडकर बैठक गये; और दिये मे जो थोडा तेल था वो सर पर लगाकर चले गये.” मुख्यमंत्र्यांनी ही शायरी म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. तसंच उपस्थितांनी टाळ्या वाजवून देवेंद्र फडणवीस यांच्या शायरीला दाद दिली. त्यांची ही शायरी चर्चेत आहे.

या सगळ्यांना माहीत आहे तोफ मागितली की बंदुक तरी मिळतेच-देवेंद्र फडणवीस

पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, हे लोक इतके हुशार आहेत की यांना माहीत आहे की तोफ मागू तेव्हा बंदूक मिळतेच. पण आनंदाची गोष्ट आहे की सातत्याने विविध विकास कामांच्या माध्यमातून आम्ही जनतेची सेवा करत आहोत. मी सुमितचं अभिनंदन करेन कारण तो पहिल्यांदाच निवडून आला आहे तरीही विकासकामं झाली पाहिजेत ही त्याची तळमळ आहे. सुमितभाऊंनी सगळी कागदपत्रंही तयार केली आहेत. पुढच्या वेळी माझी सहीही कराल आणि मान्यता घ्याल असं करु नका असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यावरही उपस्थितांमध्ये हशा पिकला.