प्रभू रामाच्या आशीर्वादाने पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचा विकास करत आहेत. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून पंतप्रधान मोदी सुराज्याची निर्मिती करत आहेत. त्यामुळे फक्त हर घर मोदी नाही तर प्रत्येकाच्या मनात मोदी आहेत. संपूर्ण देशात हे चित्र दिसतं आहे असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींचं रामटेकच्या सभेत कौतुक केलं. तसंच त्यांनी उद्धव ठाकरेंना आणि विरोधकांना टोला लगावला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विरोधक मोदी द्वेषाने पछाडले आहेत

सत्तेच्या खुर्ची मिळाली पाहिजे हे वाटणारे विरोधक मोदी द्वेषाने पछाडले आहेत. ज्यांचं आयुष्य रोख पैसे मोजण्यात आणि भ्रष्टाचारात गेलं त्यांनी मोदींवर आरोप करु नये. मराठीत एक म्हण आहे, अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन पळ. अशी त्यांची अवस्था आहे. मोदींवर ते वारंवार करतात, मोदी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. मोदींना थोडीशी नजर त्यांच्याकडे फिरवली तर फेसबुक लाईव्ह करणाऱ्याच्या तोंडून फेस येईल असा टोला एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. हाथी चले बाजार ही पण म्हण तुम्हाला माहीत असेलच. २०१४ ला ज्यांनी टीका केली त्यांना जनतेने घरी बसवलं. २०१९ ला आरोप केले त्यांनाही जनतेने घरी बसवलं. आता हे इतके आरोप करत आहेत की मतांचे सगळे रेकॉर्ड मोदीच तोडतील. १४० कोटी लोक मोदींबरोबर आहेत.

हे पण वाचा- “तोलून मापून बोलतोय, तोंड उघडलं तर..”, अजित पवारांचा कुटुंबाला थेट इशाराच

इंडिया आघाडीकडे अहंकार आहे

एनडीएकडे आत्मविश्वास आहे, इंडिया आघाडीकडे अहंकार आहे. आत्मविश्वास विजयाकडे घेऊन जातो, अहंकार विनाशाकडे घेऊन जातो. इंडिया आघाडीच्या अहंकाराची लंका जनता जाळून खाक करेल यात शंका नाही. त्यांच्याकडे ना नीती आहे ना, निर्णय. त्यांचा अजेंडा आहे भ्रष्टाचार प्रथम. पण मोदींचा अजेंडा आहे नेशन फर्स्ट. सत्तेसाठी साप आणि मुंगुस एकत्र आले आहेत. जनतेला हे सगळं माहीत आहे. त्यांना घरचा रस्ता दाखवायचं काम आपल्याला सगळ्यांना करायचं आहे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामटेकमधल्या सभेत म्हटलं आहे.

देशातल्या प्रत्येक वर्गाची प्रगती करण्यासाठी पंतप्रधान मोदी काम करत आहेत, यापुढेही काम करतील. त्यामुळे संपूर्ण देश मतदानाच्या दिवसाची वाट बघत आहेत. १९ तारखेला रामटेकमधून राजू पारवे यांना त्यांच्या नावासमोरचं धनुष्यबाणाचं बटण दाबून आणि नितीन गडकरींना कमळाचं बटण दाबून विजयी करु इतकंच सांगतो असंही आवाहन एकनाथ शिंदेंनी केलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm ekanth shinde slams uddhav thackeray for his comment on narendra modi also taunts on fb live scj