शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतल्यापासून त्यांचे दिल्ली दौरे वाढले आहेत. आज सायंकाळी सात वाजता ते पुन्हा एकदा दिल्लीकडे रवाना होत आहेत. रात्री ९ वाजता ते महाराष्ट्र सदन येथे पोहोचणार आहेत. त्यांचा हा पाचवा दिल्ली दौरा असून ते भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाची भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्य म्हणजे यावेळी दिल्ली दौऱ्यात त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नसणार आहेत. त्यामुळे हा दिल्ली दौरा नेमका कोणत्या कारणांसाठी आहे? याबाबत राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लावले जात आहेत.
या दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटून मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा करण्याची शक्यता आहे. तसेच शिंदे गट आणि ठाकरे गटाचा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. त्याविषयी वकिलांच्या गाठीभेटी घेण्याची शक्यता आहे. याबाबतचं वृत्त एबीपी माझा वृत्तवाहिनीनं दिलं आहे.
हेही वाचा- “तब लडे थे गोरों से, अब लडेंगे चोरों से” केंद्र सरकारविरुद्ध काँग्रेसचं राज्यभर आंदोलन
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून त्यांचा हा पाचवा दिल्ली दौरा आहे. पहिल्या दौऱ्यात एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. दुसऱ्या दौऱ्यात त्यांनी शिवसेनेच्या बंडखोर खासदारांची भेट घेतली होती. तिसऱ्या दौऱ्यात त्यांनी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या समारोपाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तर चौथ्या दौऱ्यात ते नवीन राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या शपथविधीसाठी उपस्थित राहिले होते.