Eknath Shinde Dasara Melava 2023 Marathi: मुंबईतील आझाद मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडत आहे. या सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्र सोडलं आहे. उद्धव ठाकरे यांच्यामुळे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे कशाप्रकारे पंख छाटण्यात आले, याबाबतचा एक किस्साही एकनाथ शिंदे यांनी सांगितला आहे.
उद्धव ठाकरे यांचं काही कर्तृत्व नव्हतं. पण राज ठाकरे प्रचंड मेहनत करायचे, त्यामुळे आनंद दिघे यांनी एका बैठकीत राज ठाकरे यांचं कौतुक केलं. यानंतर आनंद दिघे यांचे पंख छाटण्याचं काम सुरू झालं, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला. तसेच आनंद दिघे यांना ज्या-ज्या पद्धतीने वागवलं, त्याचा मी स्वत: साक्षीदार आहे, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
हेही वाचा- “अजित पवारांना सोडणार नाही, उलटं लटकवणार…”, PM मोदींच्या विधानाचा उल्लेख करत संजय राऊतांचा हल्लाबोल
दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणात एकनाथ शिंदे म्हणाले, “याठिकाणी मी एवढंच सांगू इच्छितो की, यांचं (उद्धव ठाकरे) तर काही कर्तृत्व नव्हतंच. पण राज ठाकरे प्रचंड मेहनत करायचे. तेव्हा एका बैठकीत धर्मवीर आनंद दिघे हे राज ठाकरेंबद्दल दोन शब्द चांगले बोलले. त्यानंतर लगेच आनंद दिघेंचे पंख छाटण्याचं काम सुरू झालं. त्यांना ज्या-ज्या पद्धतीने वागवलं त्याचा साक्षीदार मी आहे. आनंद दिघेंचा अपघात झाल्यानंतर ते बघायला आले नाहीत. अंत्ययात्रेलाही आले नाहीत. आम्हीच त्यांची सगळ्यात मोठी समाधी बांधली. या समाधीला भेटदेखील दिली नाही. मी जेव्हा त्यांना (उद्धव ठाकरे) भेटायला गेलो, तेव्हा त्यांनी मला विचारलं, आनंद दिघेंची संपत्ती कुठे कुठे आहे? अरे तो फकीर माणूस होता. त्यांच्याकडे काय संपत्ती असणार”