गेल्या जवळपास दीड वर्षांपासून महाराष्ट्रात सत्तासंघर्षाचा पेच सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांचं नेमकं काय होणार? ते अपात्र ठरणार का? याबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात आहे. विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एकनाथ शिंदेंच्या अपात्रतेबाबत सूचक विधान केलं आहे. एकनाथ शिंदेंसह १६ आमदार अपात्र होऊ शकत नाहीत, असं वक्तव्य मुनगंटीवार यांनी केलं. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.
सत्तासंघर्षावर भाष्य करताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “आपल्याला माहीत आहे की, एकनाथ शिंदे दुसऱ्या पक्षात गेले नाहीत. त्यामुळे ते अपात्र होऊ शकत नाहीत. भाजपाने मुख्यमंत्री म्हणून त्यांना पाठिंबा दिला आहे. संख्येच्या आधारावर विचार केला तर एकनाथ शिंदे यांच्याबरोबर ४० आमदार गेले आहेत. संख्या मोठी असल्याने ते अपात्र होऊ शकत नाहीत. आमदार अपात्र होण्यासाठी विधानसभेत व्हिप काढावा लागतो. प्रतोदने व्हिप काढला आणि त्या व्हिपचं उल्लंघन केलं तर पक्षाच्या आदेशाचं उल्लंघन केलं म्हणून संबंधित आमदार अपात्र होऊ शकतात.”
“पण २९ जूनला उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला होता. त्यांनी राजीनामा न देता ३० जूनला विश्वासदर्शक प्रस्तावाला सामोरे गेले असते आणि व्हिप काढला असता, तर तांत्रिकदृष्ट्या अनेक प्रश्न निर्माण झाले असते. पण उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. त्यामुळे हाही प्रश्न उपस्थित होत नाही,” असंही मुनगंटीवार यांनी नमूद केलं.
हेही वाचा- एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात? कुणाची वर्णी लागणार? रामदास आठवले म्हणाले…
“आपल्याकडे कोणत्या पक्षाची जबाबदारी कुणाकडे असावी? पक्षाचा प्रमुख कोण? त्या पक्षाचं चिन्ह कुणाकडे असावं? याचा निर्णय संविधानानुसार निवडणूक आयोग घेत असतो. त्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांना पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह मिळालं आहे. पक्ष प्रमुखाची जबाबदारीही त्यांच्याकडे आली आहे. त्यामुळे मला व्यक्तीगत कुणी विचारलं तर शिंदे गटाकडून कोणत्याही नियमांचं उल्लंघन झालं नाही, ज्यामुळे तुम्ही त्यांना अपात्र करू शकाल, हे माझं व्यक्तीगत मत आहे,” असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.