मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ९ एप्रिल रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. येथे एकनाथ शिंदे प्रभू श्री रामाचे दर्शन करणार आहेत. तसेच, अयोध्या दौऱ्यात एकनाथ शिंदे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार आहेत. आठ महिन्यांपूर्वी घडलेल्या सत्तांतरानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री शिंदे अयौध्या दौऱ्यावर जाणार आहेत.
अयोध्या दौऱ्यासाठी शिवसेनेकडून ( शिंदे गट ) जय्यत तयारी सुरू आहे. या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांबरोबर मंत्री, आमदार, पदाधिकारी अयोध्येला जाणार आहेत. कार्यकर्त्यांना अयोध्येला जाण्यासाठी विशेष रेल्वेही बुक करण्यात आल्या आहेत.
शिवसेना ( शिंदे गट ) प्रवक्ते नरेश मस्के यांनी अयोध्या दौऱ्याआधी एक टिझर ट्विट केला आहे. यामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, दिवंगत आनंद दिघे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बॅनरवर दिसत आहेत. तसेच, प्रभू श्री रामाचे अयोध्येतील नवीन मंदिरही दाखवण्यात आलं आहे.
हेही वाचा : मढमधील अनधिकृत स्टुडिओंवर हातोडा पडणार, सोमय्यांची अस्लम शेख आणि आदित्य ठाकरेंवर टीका; म्हणाले…
कसा असेल अयोध्या दौरा?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ४० आमदार आणि पदाधिकाऱ्यांसह अयोध्या दौऱ्यावर जात आहे. यात ते प्रभू श्रीरामचे दर्शन, हनुमान गढी दर्शन, मंदिराच्या बांधकाम जागेची पाहणी, शरयू आरती आणि लक्ष्मण किल्ला मंदिरात संतांचे आशीर्वाद घेणार आहेत. शिवसैनिक ८ एप्रिलला तर, मुख्यमंत्री शिंदे ९ एप्रिलला अयोध्येत जाणार आहेत. संध्याकाळी शरयू आरती करून ते मुंबईत परततील.