छत्रपती संभाजी नगरमध्ये आयोजित करण्यात आलेली कॅबिनेटची बैठक संपली आहे. सुमारे सात वर्षानी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह सगळेच मंत्री उपस्थित होते. मराठवाड्यासाठी ५९ हजार हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. नदीजोड प्रकल्पाच्या १४ हजार कोटींचाही यात समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलं आहे?

मराठवाड्याला न्याय देण्यासाठी आणि ठोस निर्णय घेण्यासाठी आमची बैठक पार पडली. यापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा बैठक झाली होती. राज्यातच नाही तर देशात एक मोठी झेप मराठवाड्याने घेतली आहे. अनेकांनी घोषणा केल्या, आम्ही काम करतो आहोत. आत्तापर्यंत आमच्या मंत्रिमंडळाने सामान्य लोकांना डोळ्यासमोर ठेवूनच निर्णय घेतले आहेत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.

वर्षभरात आमच्या महायुती सरकारने जे निर्णय घेतले पहिल्या कॅबिनेटपासून ते आजपर्यंत, त्यात सर्व सामान्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून घेतले. आतापर्यंत शेतीला पाणी पाहिजे, जमिनीला पाहिजे ही भावना ठेवून ३५ सिंचन प्रकल्पाला सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली. त्यामुळे ८ लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

आम्ही फक्त घोषणा करत नाही

आम्ही घोषणा करून कागदावर ठेवत नाही. त्याची अमलबजावणी करतो. आम्ही जे निर्णय घेतले ते मराठवाड्याच्या विकासासाठी, मराठवाड्यातील लोकांना न्याय देण्यासाठी आहे. जे प्रकल्प प्रलंबित आहेत ते आम्ही मार्गी लावत आहोत. समृद्धी महामार्ग मराठवाड्याला लागून जातो. त्याचा फायदा होईल. औद्योगिक इंडस्ट्री वाढते आहे. त्याचाही फायदा मराठवाड्याला होणार आहे, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

गोदावरी खोऱ्यात पाणी वळवण्यात येणार आहे. त्यावर १३ हजार कोटीचा खर्च अपेक्षित आहे. सिंचनावरील १४ हजार कोटी आणि गोदावरी खोऱ्यासाठीचे १३ हजार कोटी असे मिळून सिंचनावर एकूण २७ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. एवढंच नाही तर आम्हाला जे नावं ठेवत आहेत त्यांना जरा सांगा की आम्ही फाईव्ह स्टार हॉटेल नाही तर शासकीय विश्रामगृहात थांबलो आहोत. जेव्हा इंडिया आघाडीचे लोक इथे आले होते तेव्हा ते फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबले होते पुढच्या वेळी त्यांना थोडा अभ्यास करायला सांगा असाही टोला एकनाथ शिंदेंनी विरोधकांना लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde announce 59 thousand crore package for marathwada scj