टी-२० विश्वचषक २०२४ च्या जेतेपदावर भारतीय संघाने आपले नाव कोरल्यानंतर आता भारतीय संघावर बक्षीसांचा अक्षरश: पाऊस पडत आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या अंतिम सामन्यात ७ धावांनी भारताने शानदार विजय मिळवला. तब्बल १७ वर्षांनी भारताने टी-२० वर्ल्डकपचे जेतेपद पटकावले आहे. त्या पार्श्वभीमीवर मुंबईत ४ जुलै रोजी भारतीय संघाचं जंगी स्वागत करण्यात आलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय संघाच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येनं मुंबईकर मरीन ड्राईव्हवर काल उपस्थित होते. काल विजय परेड पार पडल्यानंतर आज भारतीय संघातील चार मुंबईकर खेळाडूंचा महाराष्ट्राच्या विधानभवनात सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय संघासाठी मोठी घोषणा केली. महाराष्ट्र सरकारकडून भारतीय संघाला तबब्ल ११ कोटी रुपयांचं बक्षिस देण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. यासंदर्भातील माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी ट्विटरवर पोस्ट करतही दिली आहे.

हेही वाचा : “आपली विकेट तर जाणार नाही ना?”, काल मुंबईत झालेल्या गर्दीवर बोलताना फडणवीसांचं मोठं विधान

महाराष्ट्र सरकारकडून विश्वविजेत्या टीम इंडियासाठी ११ कोटी रुपयांचं बक्षिस जाहीर करण्यात आलं आहे. तसेच मुंबई महानगर क्षेत्रात भविष्यात भव्य आणि आधुनिक असे स्टेडियम उभारण्यास गती देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं की, “भारत हा क्रिकेटमध्ये विश्वगुरू आहे. हे आपल्या टी-२० विश्वचषक विजेत्या संघाने सिद्ध केलं आहे. पराभवाच्या छायेतून विजय खेचून आणून कर्णधार रोहित शर्मा आणि त्याच्या संघाने भारतीयांची छाती अभिमानाने फुलून यावी, अशी कामगिरी केली आहे”, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

दरम्यान, विश्वविजेत्या टीम इंडियासाठी आज विधानभवनात सत्कार समारंभाच्या कार्यक्रमासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह आदी महत्वाचे नेते उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde announced a prize of rs 11 crore for t20 world cup team india gkt