सोलापूर : पुण्यातील सदाशिव पेठेत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणीवर एकतर्फी प्रेमातून कोयत्याने हल्ला करणाऱ्या तरुणाला वेळीच पकडून त्या तरुणीचे प्राण वाचविणाऱ्या दोघा तरुणांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
लेशपाल जवळगे (रा. आढेगाव, ता. माढा, जि. सोलापूर) आणि त्याचा मित्र हर्षल पाटील या दोघांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून हल्लेखोराला पकडल्यामुळे संबंधित तरुणीचे प्राण थोडक्यात बचावले. दर्शना पवार हिच्या हत्येनंतर लगेचच पुण्यात तरुणीवर भर रस्त्यावर दिवसाढवळ्या कोयत्याने हल्ला करण्याचा प्रकार घडल्यामुळे सार्वत्रिक संताप व्यक्त होत असताना विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राज्यातील महायुती सरकारवर टीकास्त्र सोडले होते. यातच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी तरुणीचे प्राण वाचविणाऱ्या लेशपाल जवळगे आणि हर्षल पाटील यांना प्रत्येकी ५१ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोलापुरात असताना शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे आणि शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी पुण्यात तरुणीचे प्राण वाचविणाऱ्या दोघा तरुणांना शासनाकडून प्रत्येकी एक लाख रुपयांचे बक्षीस देण्याची विनंती केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकी एक लाखाची नव्हे तर पाच लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले. ही माहिती जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी दिली. त्यास प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी दुजोरा दिला आहे.