शुक्रवारी अजित पवार यांनी राज्याचा पूर्ण अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात अनेक घोषणांचा समावेश करण्यात आला आहे. या घोषणांवर विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून झालेल्या तरतुदी अशी टीका विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आज महायुती सरकारकडून आणखी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत एका चर्चेदरम्यान दिलेल्या उत्तरामध्ये यासंदर्भात घोषणा केली असून ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ असं या योजनेचं नाव आहे. खुद्द एकनाथ शिंदे यांनीच विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना या घोषणेसंदर्भात व योजनेसंदर्भात माहिती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानभवनात माध्यमांशी बोलताना सभागृहात नेमकं काय घडलं? यासंदर्भात माहिती दिली. “वारकऱ्यांसाठी आम्ही घोषणा केली. लाडक्या बहिणींसाठीही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना केली. बेरोजगार सुशिक्षित तरुणांसाठी अॅप्रेंटिसची योजना केली. मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांसाठीही आम्ही मोठा निर्णय घेतला. त्याशिवाय आज सभागृहात आमदार प्रताप सरनाईक यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेनंतर ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’देखील राबवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे”, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

यात्रा आर्थिकदृष्ट्या परवडत नाही अशा ज्येष्ठांसाठी योजना!

“ज्या ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शनाची अपेक्षा असते, पण सगळ्यांनाच ते आर्थिकदृष्ट्या परवडत नाही, अशा ज्येष्ठांना राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करावी अशी मागणी लक्षवेधीद्वारे करण्यात आली होती. त्यात चारधामसारखी तीर्थक्षेत्र आहेत. जैनांची तीर्थक्षेत्र आहेत, ख्रिश्चन व बौद्धांचीही तीर्थक्षेत्र आहेत. अशा सगळ्या तीर्थक्षेत्रांची यात्रा ज्यांना करायची आहे, अशा लोकांसाठी योजना करण्याची मागणी होती. हे सरकार सर्वसामान्यांचं आहे. दरवर्षी काही आमदार आपापल्या मतदारसंघातून लोकांना तीर्थ यात्रेला घेऊन जात असतात. त्यामुळेच आज मुख्यमंत्री देवदर्शन तीर्थक्षेत्र योजना सरकारने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे”, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

“…तोपर्यंत बुलडोझर कारवाई सुरुच राहणार”, ड्रग्ज प्रकरणावरून मुख्यमंत्री शिंदेंचा इशारा

“या योजनेसाठी एक धोरण ठरवलं जाईल. त्यानुसार अर्ज मागवले जातील. रोटेशननुसार एक संख्या निश्चित करून तेवढ्या ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या माध्यमातून तीर्थयात्रेला नेण्यात येईल”, असं एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं.

कोणत्या धर्मीयांना होणार योजनेचा फायदा?

दरम्यान, यावेळी माध्यम प्रतिनिधींनी नेमक्या कोणत्या धर्मीयांना या योजनेचा फायदा होणार? असा प्रश्न विचारला असता त्यावर मुख्यमंत्र्यांनी “ज्याप्रकारे हजला यात्रेकरू जातात, त्याचप्रमाणे हिंदू, बौद्ध, शीख, ख्रिश्चन, जैन धर्मीयांनाही या योजनेतून तीर्थयात्रेला जाता येईल”, असं नमूद केलं. तीर्थयात्रा योजनेत हजही आहे का? असा प्रश्न विचारला असता, “ती यात्रा तर पहिल्यापासून आहेच”, असं उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde announced mukhyamantri teertha darshan yojana in maharashtra assembly monsoon session pmw