ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावर टीका केली होती. फक्त १० लोकांची संमती असताना मुख्यमंत्र्यांसह एकूण ५० लोक जात आहेत. त्यांच्यामध्ये मुख्यमंत्री, मंत्री यांचे पीए, ओएसडी यांचा समावेश आहे. ही जनतेच्या पैशांची उधळपट्टी आहे असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. या आरोपांना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलं आहे.
दावोस दौऱ्याविषयी काय म्हणाले मुख्यमंत्री?
मुख्यमंत्री रात्री १ वाजण्याच्या सुमारास दावोसला गेले. त्यांच्याबरोबर राज्यातले मंत्रीही होते. त्यांनी या दौऱ्याबाबत सविस्तर माहिती दिली. “दावोसला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी तीन दिवसांचा दौरा आम्ही करतो आहोत. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात विदेशी गुंतवणूक आली पाहिजे यासाठी चांगला फोरम दावोस या ठिकाणी मिळतो. महाराष्ट्राचं ब्रांडिंग करणं, शोकेसिंग करणं याची ही संधी असते. त्याचा फायदा महाराष्ट्राला नक्की होईल. महाराष्ट्राकडे वेगळ्या अपेक्षेने जगातले लोक पाहात आहेत. महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यात विदेशी कंपन्या आग्रही आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सामंज्यस करार होतील. त्याची अमलबजावणीही होईल. मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक होईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तसंच त्यानंतर त्यांनी आदित्य ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिलं.
आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर
उद्योग विभाग आणि मुख्यमंत्री कार्यालय असं १० लोकांचं शिष्टमंडळ दावोसला जातं आहे. तसंच MMRDA आणि महाप्रीन असे आठ लोक जात आहेत. त्यांनाही केंद्राकडून संमती मिळाली आहे. त्यांच्यासारखे (आदित्य ठाकरे) आकडे फुगवून कागदावर ठेवण्यासाठी आम्ही जात नाही. जे करारनामे होतील त्याची अमलबजावणी होईल. ते काय बोललेत याबद्दल मला काही बोलायची आवश्यकता नाही. कारण त्यांनी जे सामंज्यस करार केले ते करार आणि प्रत्यक्षात सुरु झालेली कामं ही महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत आहेत. फक्त बोलघेवडेपणा करुन महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यांमध्ये धूळ फेकता येणार नाही. जे करार आम्ही करु त्याची अमलबजावणी होईल असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?
मुख्यमंत्री म्हणून जेव्हा तुम्ही दावोसला जाता तेव्हा केंद्रीय परराष्ट्र खातं आणि अर्थ खातं यांच्याकडून संमती दिली जाते. या खात्यांकडे १० लोकांनी परवानगी मागितली होती आणि परवानगी दिली गेली आहे. आता ५० लोक जात आहेत ती संमती घेतली आहे की नाही? कारण संमती फक्त १० लोकांची संमती घेतली आहे. माझी भीती असल्याने चार्टर्ड प्लेनने ते जात नाहीयेत. तसंच २० कोटींच्या वर खर्च दाखवायचा नाही असं ठरलं आहे. एक खासदार जात आहे, एक माजी खासदार जात आहेत. आता गद्दारी केली तर दावोसला नेत आहेत अशी बोचरी टीका आदित्य ठाकरेंनी केली होती.
जे लोक जात आहेत ते महाराष्ट्राच्या हितासाठी चालले आहेत का? परराष्ट्र खात्याने ५० लोकांची संमती दिली आहे का? १० लोकांची संमती काढून ४० लोक जास्त का नेले जात आहेत? आज मुख्यमंत्री कार्यालयाने प्रेस नोट काढून हे सांगावं की नेमकी किती लोकांना संमती देण्यात आली आहे? तिथले फोटो आणि व्हिडीओही येऊ शकतात. मागच्या दौऱ्यांमध्ये काय घडलं? त्याविषयी आम्ही पुढच्या पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती देऊ असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं होतं. या टीकेला आता एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे.