आज उद्धव ठाकरे यांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. आम्ही घरात बसून व्हीसी घेऊन सूचना करत बसलो नाही. पाऊस आला, संकट आलं तेव्हा आम्ही फिल्डवर गेलो घरात बसून राहिलो नाही असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तसंच लंडन दौऱ्यापेक्षा महाराष्ट्राचा दौरा केलेला कधीही चांगला असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंनाही उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

२०१९ पासून जे मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्षेत सत्तेत होते. त्यांनी आरोप करताना आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल त्याआधीच सांगतो की मी पण त्या सत्तेत होतो. पण कॅप्टन महत्त्वाचा असतो. तो ज्या दिशेने जहाज नेतो त्याच दिशेने ते जातं. सांगायचं तात्पर्य हे की मागच्या सरकारपेक्षा निम्म्या कालावधीत आम्ही अधिक पटीने मदत आम्ही दिली आहे. आधीच्या सरकारप्रमाणे फक्त घोषणा करुन शेतकऱ्यांच्या तोंडाला आम्ही पानं पुसलेली नाहीत. ३० जून २०२२ या आमचं दिवशी सरकार सत्तेत आल्यानंतर पुढच्या आठवड्यात अतिवृष्टी झाली. तेव्हा आम्ही दौरा केला होता. माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणून व्हीसीद्वारे आम्ही बैठका घेतल्या नाहीत. इतरांना सूचना देत बसलो नाही आम्ही फिल्डवर जाऊन काम केलं असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

लंडन दौऱ्यापेक्षा राज्याच्या कानाकोपऱ्यात गेलेलं कधीही चांगलं

आपल्याला सातत्याने विचारणारं कुणीतरी आहे असं लक्षात आलं की यंत्रणाही काम करते. कलेक्टरही कामाला लागले. विरोधकांनी आत्मपरीक्षण करायला हवं. मुख्यमंत्री आणि आमचे सहकारी सतत दौऱ्यावर असतात असंही कुणीतरी म्हणालं. पण पोराटोरांना योग्य वयात समजावून सांगितलं की त्यांना समज येते. लंडन दौऱ्यापेक्षा राज्याच्या कानाकोपऱ्यात गेलेलं चांगलं असतं असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला. कोव्हिड काळात जे आपल्या मतदार संघात गेले नाहीत त्यांनी मला हे सांगू नये. मला नाईलाजाने हे सांगावं लागतं आहे कारण तसे आरोप होत आहेत, त्यामुळे बोललो असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

शेतकरी अडचणीत असताना आम्ही कधीही घरात बसून राहिलो नाही. आम्ही बांधावर गेलो आहोत, शेतावर गेलो आहोत आणि त्यांना समजून घेतलं आहे. अधिवेशन काळातही मदत केली. आमचं सरकार हे शेतकऱ्यांना मदत करणारं सरकार आहे. दुष्काळ आणि अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. विरोधक अंधारात आरोपांचे बाण चालवत आहेत. चाळीस तालुक्यांतल्या शेतकऱ्यांना २ हजार ५८७ कोटींची मदत देण्याबाबत आम्ही केंद्राला पत्र दिलं आहे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.