शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अधिवेशनाला गैरहजर राहून दिल्लीला जाणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर खोचक टीका केली. “एकनाथ शिंदे नवस फेडण्यासाठी दिल्लीवाऱ्या करतात” या ठाकरेंच्या टीकेला आता एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं. “माझ्या दिल्ली दौऱ्यावर टीका करणाऱ्यांनी आधी मी कोणत्या कार्यक्रमाला चाललो आहे याची माहिती घेतली पाहिजे होती”, असं मत शिंदेंनी व्यक्त केलं. ते सोमवारी (२६ डिसेंबर) लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना भेटल्यानंतर माध्यमांशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकनाथ शिंदे म्हणाले, “माझ्यावर कोण टीका करतंय? आज दिल्लीत वीर बाल दिवस होता. गुरुगोविंद सिंगांच्या सहा आणि नऊ वर्षांच्या दोन मुलांचं बलिदान झालं. त्यांचा सन्मान म्हणून केंद्र सरकारने २६ डिसेंबरला वीर बाल दिवस साजरा केला. गुरुगोविंद सिंग, महाराष्ट्र आणि पंजाब यांचं नातं असल्याने मला केंद्र सरकारच्या या कार्यक्रमाला बोलावलं होतं.”

“माझ्या दिल्ली दौऱ्यावर बोलणारांनी आधी माहिती घ्यावी”

“खरं म्हणजे माझ्या दिल्ली दौऱ्यावर बोलणारांनी आधी माहिती घेतली पाहिजे होती की, मी दिल्लीला कुठल्या कार्यक्रमाला चाललो आहे. त्या मुलांनी स्वतःच्या प्राणांचं बलिदान दिलं. परंतु आपला स्वाभिमान जाऊ दिला नाही. अशा शौर्याच्या गाथा निर्माण करणाऱ्या मुलांनी आदर्श घालून दिला.”

ओम बिर्लांच्या भेटीचं कारण काय?

पत्रकारांनी एकनाथ शिंदेंना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेण्याचं कारण विचारलं. त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, “ही भेट सदिच्छा भेट होती. त्यांनी मला त्यांच्या घरी बोलावलं होतं.”

“ती काळजी कर्नाटकनेही घेतली पाहिजे”

उद्धव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत वादग्रस्त सीमाभाग केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी केली. त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, “हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे. पहिल्यांदाच केंद्रिय गृहमंत्र्यांनी यात हस्तक्षेप केला आणि दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलावलं. तसेच खटला न्यायालयात आहे तोपर्यंत कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होऊ नये याच्या सूचना त्यांनी दिल्या. हा विषय ६० वर्षांचा आहे. असं असताना या खटल्यावर कोणताही परिणाम होऊ नये याची आम्ही काळजी घेत आहोत. ती काळजी कर्नाटकनेही घेतली पाहिजे.”

हेही वाचा : “तिचे दाऊदशी संबंध”, राहुल शेवाळेंच्या आरोपावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेचं प्रत्युत्तर, म्हणाली…

“आम्हाला इतरांनी शिकवण्याची गरज नाही”

“आज जे केंद्रशासित प्रदेश करा म्हणत आहेत त्यांनी तर त्यांच्या योजना बंद केल्या. मुख्यमंत्री धर्मादाय निधी बंद केला. महात्मा जोतिबा फुले योजना बंद केली. आम्ही तर ते सुरू केलं. आम्ही २००० कोटी रुपयांची म्हैसाळ योजना मंजूर केली. हा एकनाथ शिंदे सीमा आंदोलनात तुरुंगवास भोगलेला व्यक्ती आहे. त्यामुळे त्यावर आम्हाला इतरांनी शिकवण्याची गरज नाही,” असं प्रत्युत्तर शिंदेंनी दिलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde answer uddhav thackeray over delhi visit criticism pbs