अंपगासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याच्या मागणीला मुख्यमंत्र्यांकडून मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे. यानिर्णयाबाबत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभारही मानले. एकनाथ शिंदे हे आता खऱ्या अर्थाने अपंगांचे नाथ ठरतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच अपंग मंत्रालय स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातले पहिले राज्य असल्याचेही ते म्हणाले. याबाबत त्यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा – संजय राऊतांच्या सुटकेनंतर उद्धव ठाकरेंची मोदी सरकारवर टीका; म्हणाले, “न्यायालयच बुडाखाली घेण्याचा प्रयत्न…”
नेमकं काय म्हणाले बच्चू कडू?
“काल आम्ही याबाबत बैठक घेतली होती. आता दिव्यांगासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय झाला आहे. आम्ही दिव्य स्वप्न बघितलं होतं. आमच्या २५ वर्षांच्या लढ्याला अखेर यश आले आहे. हा ऐतिहासीक आणि क्रांतीकारी निर्णय आहे. देशाच्या पातळीवर पहिल्यांदा असं मंत्रालय स्थापन करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं आहे. जागतिक अंपग दिनाच्या दिवशी म्हणजेच ३ डिसेंबर रोजी याची घोषणा होईल”, अशी माहिती आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे.
“या निर्णयाने राज्यभरातील दिव्यांगाना मदत होणार आहे. स्वाधार्य योजना असेल किंवा गाडगेबाबांच्या नावाने दिव्यांगांना स्वातंत्र घरकूल योजना सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. मुकबधीरांसाठीही अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. येत्या १५ दिवसांत याचा शासन निर्णय होईल”, असेही ते म्हणाले.
हेही वाचा – “सूर बदले है जनाब के, कालचा वाघ…” मनसेचा संजय राऊतांना उद्देशून खोचक ट्वीट; सुषमा अंधारेंनाही टोला!
“राज्य सरकारने घेतलेला निर्णय छोटा निर्णय नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो. ते खऱ्या अर्थाने आता अपंगांचे नाथ ठरतील. त्यांनी मोठं आणि पुण्याचं काम केले आहे. हे मंत्रालय निश्चितच राज्याला एक दिशा देणारे ठरेल, असेही ते म्हणाले. तसेच दिव्यांगासाठी स्वतंत्र मंत्रालय असेल, पॅराऑलिंपिकच्या दृष्टीने एक स्टेडिअम निर्माण होणं गरजेचं आहे. रोगजार आणि शिक्षणाच्याबाबतीतही अनेक विषय आहेत. ते आता मार्गी लागतील”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.