उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना धमकी आणि लाच देण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बुकी माफिया अनिल जयसिंघानी आणि अनिक्षा जयसिंघानी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अनिक्षा जयसिंघानी हीला पोलिसांनी अटक केली असून, अनिल जयसिंघानी फरार आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य करत महाविकास आघाडीला लक्ष्य केलं आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:हा सभागृहात निवेदन दिलं आहे. यातील आरोपी अनिल जयसिंघानी हा महाविकास आघाडीतल सर्व पक्षात गेला होता. याची सखोल चौकशी होणार आहे. जाणीवपूर्वक ही बदनामी करण्यात आली आहे. याच्या पाठीमागे कोणी असतील त्याचा नक्की शोध लागेल. खालच्या पातळीवर राजकारण होऊ नये, ही परंपरा आहे. आरोपीची नक्की शोध लागेल.”
हेही वाचा : “दिल्लीच्या ‘जी हुजुरी’मध्ये रमलेले…”, बोम्मईंच्या ‘त्या’ कृतीमुळे ठाकरे गटाचा शिंदे सरकारवर घणाघात
“मला अडकवण्यासाठी कुटुंबाला लक्ष्य”
गुरूवारी विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं, “राजकारण आज हीन पातळीला पोहचले आहे. मला अडकवण्यासाठी कुटुंबाला लक्ष्य करण्यात आलं. या तरूणीच्या संभाषणात काही पोलीस अधिकारी आणि राजकीय व्यक्तींची नावे पुढं आली आहेत. पुरावे मिळाल्यावर ती उघड करेन,” असं फडणवीसांनी म्हटलं.
“याच्या पाठीमागची गोष्ट काय आहे, हे…”
ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी याप्रकरणाच्या स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे. प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, “अमृता फडणवीस प्रकरणात २० फेब्रुवारीला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मग आताच का अटक करण्यात आली. २०१६ साली देवेंद्र फडणवीस स्वत: मुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते. मग जिचे वडील बुकी माफीया असून, पाच राज्याचं पोलीस मागावर आहेत, त्या महिलेला तुम्ही घरात कसं येऊन दिलं. आज कळलं की ती डिझायनर नाही. त्यामुळे याच्या पाठीमागची गोष्ट काय आहे, हे सर्वांसमोर आलं पाहिजे.”
हेही वाचा : भाजप-शिवसेनेचे जागावाटप झालेले नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्पष्टीकरण
“उद्या दाऊदची नात येऊन सांगेल की…”
“गृहमंत्री असताना सुद्धा तुम्हाला माहिती नाही की, तुमच्या घरी कोण येत आहे. उद्या दाऊदची नात येईल आणि सांगेल मी फॅशन डिझायनर आहे. मला आई-वडील नसल्याने माझी प्रसिद्धी करण्यास मदत करा. त्यामुळे याची तुम्हाला माहिती नाही किंवा यात तुम्ही सामील आहात. म्हणून स्वतंत्र चौकशी केल्याने सर्व समोर येणार आहे,” असं प्रियंका चतुर्वेदींनी सांगितलं आहे.