शिवसेनेत ४० आमदारांनी बंड केल्यापासून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे सातत्याने त्यांच्यावर बाप पळवणारी टोळी म्हणत टीका केली. या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आम्हाला म्हणतात बाप चोरणारी टोळी निर्माण झालीय. अरे तुम्ही तर बापाचे विचार विकले, तुम्ही बापालाच विकण्याचा प्रयत्न केला, असा पटलवार एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.
बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली. “सहन करण्याची एक मर्यादा असते. सत्तेसाठी तुम्ही हिंदुत्वाला तिलांजली दिली, मग खरे गद्दार कोण? जनतेला समजलं आहे. त्यामुळे जनता आमच्याबरोबर आहे.”
हेही वाचा – “एकनाथला एकटानाथ होऊ देऊ नका”, जयदेव ठाकरेंची शिवसैनिकांना साद; म्हणाले, “महाराष्ट्रात शिंदेराज्य…”
“बाळासाहेबांच्या समाधीवर गुडघे टेकून…”
“बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देऊन तुम्ही जे पाप केलं, ते शिवसैनिक कधीही विसरणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जनताही तुम्हाला माफ करणार नाही. तुम्ही वैचारिक व्यभिचार केला आहे. तुम्ही जे पाप केल आहे, त्यासाठी आधी बाळासाहेबांच्या शिवतीर्थावरील समाधीवर गुडघे टेका आणि माफी मागा, मग आमच्यावर बोला,” असे आव्हान एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे.