– शुभम बानुबाकोडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कधीही शाळेत न गेलेल्या गाडगेबाबांनी आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्याला शिक्षणाचं महत्त्व सांगितलं. आपल्या कीर्तन आणि खंजेरीच्या माध्यमातून त्यांनी गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने काम केलं. मात्र, आपलं दुर्देव असं की आज आपण बाबांच्या विचारांना तिलांजली देतोय. ज्या अमरावतीमध्ये गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराजांचा जन्म झाला, त्याच अमरावतीत आज अंधश्रद्धेचं दुकान सुरू असताना आपण त्यावर काहीच बोलत नाही किंवा आपल्याला साधी चीडही येत नाही.

हे सर्व सांगायचं कारण एवढच की सध्या अमरावतीत पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथा वाचनाचा कार्यक्रम सुरू आहे. त्यासाठी लाखो भाविक गर्दी करतात. मी ‘अंद्धश्रद्धेचं दुकान’ असा शब्दप्रयोग केला, त्याचं कारण काय? तर हे महाराज सांगतात, जर मुलाने वर्षभर अभ्यास केलेला नसेल तरी चालेल, पण परीक्षेच्या दिवशी त्याच्या आईने बेलपत्र घेऊन शिवपिंडीला वाहावं, म्हणजे त्यांचा मुलगा परीक्षेत पास होईल, इतकंच नाही तर ते बरोजगारांनाही सांगतात, की तुम्हाला जॉब मिळत नसेल तर शिवपिडींवर धतुऱ्याचं फळ- पान वाहावं, म्हणजे तुम्हाला जॉब मिळेल. असं हे अंधश्रद्धेचं दुकान.

हेही वाचा : चिंतनधारा: बेशुट आया जमाना, शासकों का पाप है।

काल या कार्यकम ठिकाणी सहज म्हणून भेट दिली. तिथल्या काही लोकांशी बोललो, तेव्हा समजलं की अनेक लोक नागपूर, यवतमाळ, अकोल्यातूनच नाही तर चक्क दिल्लीहून आले आहे. अर्थात इथं येणं हा ज्याच्या- त्याच्या श्रद्धेचा विषय आहे. मला त्याविषयी काहीही बोलायचं नाही. तो अधिकार त्यांना संविधानाने दिलेला आहे. पण मूळ मुद्दा असा आहे की, ज्या अमरावतीत गाडगेबाबांसारखा समाजसुधारक जन्माला आला, त्यांनी ज्या अमरावतीतून समाजप्रबोधनाला सुरुवात केली, त्याच अमरावतीचे नागरिक आयोजक आणि इथलं प्रशासन त्यांच्या विचारांना हरताळ फासतंय.

संत गाडगेबाबांनी आयुष्यभर तुकाराम महाराजांचा विचार पुढे नेण्याचं काम केलं. तुकाराम महाराज म्हणत, “वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें, पक्षी ही सुस्वरें आळविती”, म्हणजेच काय तर वृक्ष हे आपले सगे सोयरे आहेत, पशु-पक्षी हे सुद्धा पांडुरंग विठ्ठलाचे नामस्मरण करीत आहेत. पण आज त्याच तुकारामांच्या महाराष्ट्रात आणि गाडगेबाबांच्या अमरावतीत काय होतंय, तर प्रदीप मिश्रांच्या कार्यक्रमासाठी भानखेडा भागातील हजारो झाडांची कत्तल करण्यात आली आहे. हा संपूर्ण जंगलाचा भाग आहे. इथे अनेक प्राणी आणि पक्षी आहेत. या झाडांच्या कत्तलीमुळे इथले प्राणी शहरात शिरले. केवळ बोटावर मोजण्याइतक्याच पर्यावरणप्रेमींनी त्या विरोधात आवाज उठवला, पण त्यांना कोण किंमत देणार? ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं, त्या राणा दाम्पत्यावर उपमुख्यमंत्र्यांचा वरदस्त आहे. त्यामुळे आपलं कोणी काही बिघडवू शकत नाही, याच तोऱ्यात सगळा कार्यक्रम सुरू आहे.

काय तर म्हणे, इथे १११ फूट उंचीची हनुमानाची मूर्ती उभारणार आहेत, तेही जंगलात. उद्या हे ठिकाण अमरावती शहरातलं एक पर्यटनस्थळ म्हणून उदयास येईल. साहाजिकच या भागात लोकांची गर्दी वाढेल. पण या वाढलेल्या गर्दीचा येथील जंगलातल्या प्राणांना त्रास होईल, याचा विचार केलाय का? त्या प्राण्यांनी त्यांचा नैसर्गिक अधिवास सोडून कुठं जायचं? इथे एक गोष्ट नमूद करतो, माझा या हनुमानाच्या मूर्तीलाही विरोध नाही, पण ही मूर्ती ज्या ठिकाणी उभारली जात आहे, त्या ठिकाणाला विरोध आहे. इतकी मोठी हनुमानाची मूर्ती उभारायचीच होती, तर चांगापूरसारख्या ठिकाणी उभारता आली असती. तिथे पर्यटनाला आणखी वाव होता, इथल्या दुकानदारांनाही त्याचा फायदा झाला असता. पण त्या जंगलातच मूर्ती का उभारायची आहे, हे सुज्ञ अमरावतीकरांनाच ठाऊक. असो, त्यावर नंतर कधी तरी बोलूया..

हेही वाचा : संत गाडगेबाबा: द्रष्टा वास्तुनिर्मितीकार

इथे आणखी एक मुद्दा मांडावासा वाटतो, तो म्हणजे काल १६ तारखेला या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच ते अमरावतीत आले. याच काळात अमरावतीत संत गाडगेबाबांचा पुण्यतिथी महोत्सव सुरू आहे. पण मुख्यमंत्र्यांना गाडगेबाबांच्या समाधीस्थळी जावसं वाटलं नाही, त्यांना एका अमराठी कथावाचकाच्या कार्यक्रमाला नागपूरहून यायला वेळ होता. पण अमरावतीत येऊन गाडगेबाबांच्या चरणी नतमस्तक व्हायला वेळ नव्हता, हे दुर्दैवच!

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde attend pandit mishra mahapuran not tribute sant gadgebaba amaravati ssa