ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. श्रीकांत शिंदे यांनी राजा ठाकूर नावाच्या गुंडाला माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी दिली आहे, असा दावा राऊत यांनी केला आहे. याबाबतचे पत्रही त्यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे. राऊतांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. दरम्यान, संजय राऊतांच्या या आरोपावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत यांनी केलेल्या आरोपांची चौकशी केली जाईल. तसेच हा आरोप स्टंटबाजी करण्यासाठी केलेला आहे का? याचाही तपास केला जाईल, असे शिंदे यांनी सांगितले. ते आज (२२ फेब्रुवारी) मुंबईत माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
…तर गृहमंत्रालयाकडून कारवाई केली जाईल
“संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांची चौकशी केली जाईल. मात्र स्टंटबाजी करण्यासाठी हे आरोप केले जात असतील तर त्याचीही चौकशी केली जाईल. सर्वांची सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी आमची आहे. मात्र कोणी कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करत असेल, तर गृहमंत्रालयाकडून कारवाई केली जाईल,” असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
आवश्यकतेप्रमाणे सर्वांना सुरक्षा पुरवली जाईल
“कोणाला किती सुरक्षा किती द्यायची यासाठी एक समिती आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे या समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यामुळे सुरक्षेचा आढावा घेऊन, सुरक्षा पुरवली जाते. कोणाचीही सुरक्षा कोणत्याही कारणाविना, राजकीय हेतू समोर ठेवून कमी केली जाणार नाही. आवश्यकतेप्रमाणे सर्वांना सुरक्षा पुरवली जाईल. कोण कोणत्या पक्षात आहे, हा विचार करून एखाद्याची सुरक्षा कमी केली जाणार नाही,” असेही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.