काही दिवसांपूर्वी मनसेने आयोजित केलेल्या दीपोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. शिवाजी पार्क येथील या दीपोत्सवात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हेदेखील उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे एका मंचावर आले होते. याच कारणामुळे मागील काही दिवसांपासून शिंदे गट, भाजपा आणि मनसे यांच्या युतीच्या रुपात राज्यात एक नवे समीकरण उदयास येणार का? असा प्रश्न विचारला जातोय. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनीदेखील याबाबत सूचक विधान केलेले आहे. मनं जुळली आहेत, तारा जुळणे बाकी, असे राजू पाटील म्हणाले आहेत. दरम्यान, याबाबत आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे. राज ठाकरे यांनी आम्हाला दीपोत्सवाच्या कार्यक्रमात बोलावले होते. त्या कार्यक्रमात कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. आम्ही फक्त सणांवर बोललो, असे शिंदे म्हणाले. ते पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होते.

हेही वाचा >>> नोव्हेंबरमध्ये शिर्डी ते नागपूर समृद्धी महामार्ग वाहतुकीस खुला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती

दीपोत्सवानिमित्त राज ठाकरे यांनी मला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलावलं होतं. दिवाळीचा सण राज्यात आनंदात साजरा होतोय. आम्ही दीपोत्सवात उपस्थित राहिलो होतो, तेव्हा कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. सण उत्सवाबाबत आम्ही बोललो होतो, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा >>> “सत्ता आणण्यात ते यशस्वी, मात्र रामराज्य…” एकनाथ खडसेंची एकनाथ शिंदेंवर टीका

श्रीकांत शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला

मागील काही दिवसांपासून शिंदे गट, भाजपा आणि मनसेच्या नेत्यांचे एकमेकांकडे जाणे वाढले आहे. राज ठाकरे सार्वजनिक कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांना आपले मित्र म्हणत आहेत. याच कारणामुळे आगामी निवडणुकीसाठी राज्यात नवे समीकरण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकीकडे या युतीबाबत चर्चा सुरु असताना दुसरीकडे शिंदे गटातील नेते श्रीकांत शिंदे यांनीदेखील राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. याआधी डोंबिवलीत मनसेने दीपोत्सवाचे आयोजन केले होते. याच भागात खासदार श्रीकांत शिंदे यांनीसुद्धा एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तेव्हादेखील श्रीकांत शिंदे यांनी डोबिंवलीतील मनसे कार्यालयाला भेट दिली होती.