लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयात असलेली वाघनखं महाराष्ट्रात आणण्यात आली आहेत. ही वाघनखं शिवाजी महाराजांची असल्याचा दावा राज्य सरकारद्वारे करण्यात आला आहे. मात्र, काही इतिहास तज्ज्ञांसह विरोधकांनी या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. यावरूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज साताऱ्यातील ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. वाघनखांवर आक्षेप घेणं म्हणजे, शिवरायांच्या शौर्याचा आणि पराक्रमाचा अपमान आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
“मी आज इथे राज्याचा मुख्यमंत्री म्हणून नाही, तर शिवरायांचा मावळा म्हणून उभा आहे. आज शेकडो मैल प्रवास करत ही वाघनखं मराठी भूमीत दाखल झाली आहेत. यासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी खूप प्रयत्न केले. त्यामुळेच आपल्याला या वाघनखांचे दर्शन झाले आहे. याबद्दल मी सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानतो”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
“हा शिवरायांच्या शौर्याचा अपमान”
“काही लोक आज या वाघनखांवर शंका उपस्थित करत आहेत. हे आपलं दुर्दैवं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला, ती वाघनखं येत आहेत, हे ऐकून प्रत्येकाला अभिमान वाटला आहे. परंतू काही लोकांना फक्त राजकारण करायचं आहे. चांगल्या कामांना गालबोट लावायचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. पण वाघनखांवर आक्षेप घेणं म्हणजे, हा शिवरायांच्या शौर्याचा आणि पराक्रमाचा अपमान आहे”, अशी प्रतिक्रियाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
“विरोधकांना दिला इशारा”
पुढे बोलताना त्यांनी विरोधकांना टोलाही लगावला, “सुधीर मुनंगटीवार यांनी आज मलाही वाघनखं भेट दिली आहेत. खरं तर मी मारलेले वरखडे अनेकदा दिसत नाहीत आणि ते बसले तर तोंड उघडून सांगता येत नाही, असे ते म्हणाले. तसेच या वाघनखांचा योग्यवेळी योग्य वापर नक्की होईल”, असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला.
हेही वाचा – Ladka Bhau Yojana : “लाडका भाऊ अशी कोणतीही योजना नाही”, जितेंद्र आव्हाडांकडून शिंदे सरकारची पोलखोल?
“प्रत्येक जण या दिवसाची आतूरतेने वाट बघत होता”
“प्रत्येक मराठी माणसांसाठी आजचा दिवस आनंदाचा दिवस आहे. प्रत्येक मराठी मनं आज सुखावली आहेत. राज्यात आज जल्लोषाचे वातावरण आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो आहे. प्रत्येक जण या दिवसाची आतूरतेने वाट बघत होता. आता उद्यापासून प्रत्येक शिवप्रेमींना या वाघनखांचे दर्शन होणार आहे. खरं तर हे दर्शन या वाघनखांचं नसून शिवरायांच्या शौर्याचे आणि पराक्रमाचं होणार आहे”, असेही ते म्हणाले.