CM Eknath Shinde : महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण आणि लाडका भाऊ ही योजना जाहीर केली असली तरी राज्याकडे पैसे नाहीत. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या घोषणा करण्यात आल्या, असा आरोप विरोधकांकडून होत असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर उत्तर दिले आहे. ते म्हणाले, विरोधकांच्या या वावड्या आहेत. विरोधकांना पोटदुखी झालेली आहे. मी कालही म्हणालो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विरोधकांना पचलेली नाही. त्यांना हाजमोला द्यायला पाहीजे. माझ्या लाडक्या बहिणीचे हे सावत्र भाऊ आहेत. माझ्या बहिणींना पैसे मिळता कामा नयेत, ही योजना सुरू होता कामा नये, यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. पण सरकार म्हणून आम्ही जेवढा पैसा लागेल तेवढा देऊ.”

हा चुनावी जुमला नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या निती आयोगाच्या बैठकीला हजर राहण्यासाठी दिल्ली येथे आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, “आम्ही कोणताही निर्णय घेतल्यानंतर मागे हटत नाहीत. आमच्याकडून ‘प्रिटिंग मिस्टेक’ झाली असे म्हणत नाही. चुनावी जुमला होता, असे म्हणत नाही. कारण आम्ही पूर्ण विचाराअंती निर्णय घेतला आहे.”

हे वाचा >> ‘भाजपने विधानसभा निवडणुकीत २८८ जागा लढवाव्यात’; खासदार नारायण राणे यांच्या वक्तव्यावर शिंदे गटाकडून नापसंती

तेव्हा निवडणुका होत्या का?

“आमच्या सरकराने महिलांना एसटीच्या तिकीटात ५० टक्के सवलत दिली, ज्येष्ठांना मोफत प्रवासाची मुभा दिली, तेव्हा निवडणुका नव्हत्या. त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणी आणि भावांनी एक गोष्ट ध्यान्यात घ्यावी की, त्यांच्याविरोधात कोण आहे”, अशीही टीका एकनाथ शिंदे यांनी केली.

हे ही वाचा >> Sharad Pawar : बुद्धीबळातला सर्वात आवडता सैनिक कोणता? उंट, घोडा, हत्ती की वजीर? शरद पवार म्हणाले…

दिल्लीत सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री शासकीय बैठकीसाठी आले असताना दोन्ही उपमुख्यमंत्रीही दिल्लीत उपस्थित आहेत. त्यामुळे विधानसभेच्या जागावाटपावर काही चर्चा झाली आहे का? असा प्रश्न यावेळी शिंदे यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, जागावाटप योग्यवेळी होईल. महायुतीने दोन वर्षात जे काम केले आहे, त्यानुसार महायुतीला यश नक्की मिळेल.

शरद पवार यांनी विविध प्रश्नांसंबधी माझी भेट घेतली होती. यावेळी आरक्षणासंबंधी आम्ही चर्चा केली. जाती-जातीवरून महाराष्ट्रात तणाव दिसत आहे. गावबंदीसारखे प्रकरणे घडत आहेत. याआधी महाराष्ट्रात असे कधी घडले नव्हते. महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे, इथे सर्व लोक गुण्या-गोविंदाने राहतात. ओबीसी आणि मराठा समाजाच्या नेत्यांना एकत्र बसवून बैठक घेतली पाहीजे, असे त्यांनी सूचविले. मीही याला समर्थन दिले. निवडणूक येतात आणि जातात. पण जे वातावरण बिघडले आहे, ते पूर्वपदावर आणणे गरजेचे आहे.