शिवसेनेच्या शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा लोकसभा निवडणुकीतील विजय सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या निकालादरम्यान मतमोजणीत गैरप्रकार झाल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे यासंदर्भात ठाकरे गट न्यायालयात जाणार असल्याचेही सांगितलं जात आहे. दरम्यान, ठाकरे गटाच्या आरोपाला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आज मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

“ठाकरे गटाला आता केवळ टीका करण्याचे काम राहिलं आहे. ज्यावेळी एखादा निकाल त्यांच्या बाजुने लागतो, तेव्हा ती संस्था चांगली असते. मात्र, विरोधात निकाल गेला, तर ती संस्था त्यांच्यासाठी वाईट होते. ज्यावेळी ते निवडणूक जिंकतात, तेव्हा ईव्हीएम चांगली असते, मात्र, पराभव झाला की ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

हेही वाचा – “छगन भुजबळांच्या भूमिका गोंधळलेल्या”, संजय शिरसाटांचं मोठं विधान; म्हणाले, “ते आजकाल उबाठा गटाची…”

“ठाकरे गटाकडून रडीचा डाव सुरू”

“या निवडणुकीत ज्याठिकाणी ठाकरे गटाचा पराभव झाला, त्या एका ईव्हीएमवर ठाकरे गटाकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मग ज्या ठिकाणी त्यांचा विजय झाला, तिथे ईव्हीएम बरोबर होत्या का? त्यामुळे ठाकरे गटाकडून ईव्हीएमबाबत खोटा प्रचार केला जातो आहे. हे पूर्णपणे खोटं आहे. ठाकरे गटाकडून रडीचा डाव सुरू आहे”, अशी टीकाही त्यांनी केली.

“ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही”

“रवींद्र वायकर यांच्या विजयामुळे ठाकरे गटाला त्रास होतो आहे. त्यांना पराभव पचवणं जड जात आहे. यापूर्वी अनेकदा तज्ज्ञांनी सांगितलं आहे, की ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही. एलॉन मस्क यांनी जे विधान केलं आहे, ते अमेरिकेतल्या ईव्हीएमबाबत होतं. मात्र, भारतातल्या ईव्हीएमला कुठेही इंटरनेट जोडले जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यात छेडछाड करता येत नाही”, असंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचा – संजय राऊत यांची टीका, “शिवसेना फोडणं हे मोदी शाह यांचं मोगलानंतरचं सर्वात मोठं आक्रमण, कारण…”

“वर्धापन दिन जल्लोषात साजरा केला जाईल”

पुढे बोलताना त्यांनी उद्या होणाऱ्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाबाबतही प्रतिक्रिया दिली. “उद्या शिवसेनेचा वर्धापन दिन असून हा दिवस जल्लोषात साजरा केला जाईल. उद्या बाळासाहेबांच्या विचारांचा वर्धापन दिन आहे. आमचे सरकार बाळासाहेबांच्या विचारावर काम करते आहे. बाळासाहेबांच्या नावाने आम्ही अनेक योजना सुरू केल्या आहेत”, असे ते म्हणाले.