लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. मुंबईतील सर्व सहा मतदारसंघ, भिवंडी, नाशिक, दिंडोरी, धुळे, ठाणे, कल्याण या मतदारसंघात आज मतदान होत आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान, या निवडणुकीच्या प्रचारात अनेकदा सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. आज मतदानाच्या दिवशी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीवर टीका केली. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “उद्धव ठाकरे कधीच तोंडावर आपटलेत, सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून येतील”, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?
“मतदानाचा पाचवा टप्पा आज पार पडत असून सर्वांना आवाहन आहे की,लोकशाहीच्या या उत्साहामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं. आपलं एक मत इतिहास घडवेल. ही निवडणूक खऱ्या अर्थाने देशाच्या विकासाची आहे. त्यामुळे सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावं. या देशाचं पुन्हा एकदा नेतृत्व करण्यासाठी नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी देशातले सर्वजण आतूरले आहेत. महाराष्ट्रात लोकांच्या प्रतिक्रिया मी पाहिल्या आहेत. देशाच्या विकासासाठी ही निवडणूक असून नागरिकांनी मतदान करत आपला हक्क बजवावा”, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
हेही वाचा : शरद पवारांचं वक्तव्य, “गरज संपल्यानंतर भाजपाची जी भावना संघाबाबत तशीच राष्ट्रवादी आणि शिवसेनेबाबत..”
आज सकाळी मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर बोगस मतदान होत असल्याचा आरोप करत काही ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला होता. यावर बोलताना शिंदे म्हणाले, “नौपाडा येथील एका मतदान केंद्रावर एक तास मतदान बंद पडलं होतं. त्यानंतर ते तात्काळ सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचनाही दिलेल्या आहेत. मात्र, बोगस मतदार आणण्याची आम्हाला गरज काय? ठाण्यात आम्ही जे काम केलं, शिवसेना आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा हा बालेकिल्ला आहे. या ठाण्यावर बाळासाहेब ठाकरे यांनी प्रेम केलेलं आहे. गेले अनेक वर्ष आम्ही ठाण्यात काम करत आहोत. ठाणे हा महायुतीचा बालेकिल्ला आहे. मतदार आजच्या दिवसाची वाट पाहत होते. ज्यांनी टीका केली त्यांनी हत्यार खाली टाकलेली आहेत. पराभवाची चाहूल त्यांना लागली आहे. ज्यावेळी पराभवाची चाहूल लागते, तेव्हा अशा प्रकारची विधाने ऐकू येतात”, असा टोला एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला.
“या निवडणुकीत दुर्दैवाने काही फतवे निघत आहेत. मात्र, आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन पुढे जात आहोत. जे काही जाती जातीत विष कालवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना महाराष्ट्रातील जनता थारा देणार नाही. या निवडणुकीत जनता त्यांना घरचा रस्ता दाखवेल. जी कामं मोदींनी १० वर्षात केली ती कामे काँग्रेसने ५० वर्षात केली नाही. त्यामुळे विरोधकांना त्यांची जागा मतदार दाखवतील आणि मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करतील. या निवडणुकीत जनता त्यांना धडा शिकवेल”, असं ते म्हणाले. मुख्यमंत्री पदाच्या मुद्यावरुन बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “ते तोंडावर कधीच आपटले आहेत. आता त्यांची तोंड फुटतील”, असा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.