राज्यातील महायुतीच्या सरकारला दोन वर्षे पूर्ण झाले. या निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर रविवारी एक पोस्ट लिहिली. या पोस्टमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी महायुती सरकारच्या दोन वर्षांच्या काळातील कामासंदर्भात भाष्य केलं. यावर प्रत्युत्तर देताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी ‘जागतिक खोके आणि धोके दिवस साजरा होत आहे’, असा टोला लगावला होता. तसेच याआधी उद्धव ठाकरे यांनी अनेकदा शिंदे गटावर बोलताना खोके सरकार म्हणून टीका केली होती. आता मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. “त्यांचं सर्व आयुष्य खोके जमा करण्यात गेलं. ठाकरे गट ही लेना बँक आहे, देना बँक नाही”, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला. ते एएनआयशी बोलत होते.

मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “शिवसेना ठाकरे गटाकडे जे साडेचार टक्के मतं राहिले आहेत. लोकसभेला ठाकरे गटाच्या काही जागा कोणामुळे निवडून आल्या हे सर्वांना माहिती आहे. काँग्रेसची व्होट बँक त्यांच्याकडे आली. मात्र, काँग्रेसची व्होट बँक तात्पुरती आहे. ही तात्पुरती आलेली सूज आहे. सूज जास्त काळ राहत नाही. उद्धव ठाकरे यांनी जी भूमिका घेतलेली आहे, ती भूमिका शिवसेनेच्या मूळ मतदारांना आवडलेली नाही. त्यामुळे लोकसभेला त्यांच्या फक्त ९ जागा निवडून आल्या”, असा हल्लाबोल मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे गटावर केला.

हेही वाचा : महायुतीत रस्सीखेच, अजित पवार गटानंतर आता महादेव जानकरांकडून विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची मागणी

ठाकरे गटाला लोकांनी त्यांची जागा दाखवली

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला लोकांनी त्यांची जगा दाखवली आहे. ठाकरे गटाची जागा फक्त आरोप करणाऱ्यांमध्ये आहे. माझ्याकडे त्यांच्याविषयी भरपूर माहिती आहे. लखनौमध्ये त्यांची २०० एकर जागा आहे. आणखी कुठे काय काय आहे? सर्व माझ्याकडे आहे. मात्र, मी आरोपाला फक्त आरोपाने उत्तर देत नाही. यावर योग्य वेळी मी सर्व बोलणार आहे”, असा इशारा मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दिला.

ठाकरे गट ही लेना बँक

“ज्यांचं आयुष्य फक्त खोके जमा करण्यात गेलं. उठता, बसता त्यांना खोक्याशिवाय काहीही समजलं नाही. याचा साक्षीदार मी आहे. राज ठाकरे एकदा म्हणाले होते की, त्यांना (उद्धव ठाकरे यांना) खोके नाही कंटेनर पाहिजे. खोके ठेवायला कंटेनर लागतो ना? त्यांनी आयुष्यभर फक्त खोके जमा करण्याचं काम केलं आहे. ते (उद्धव ठाकरे) फक्त लेना बँक आहेत, देना बँक नाही”, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.