मागील अनेक दिवसांपासून पालकमंत्रिपदाच्या वाटपाची चर्चा सुरू होती. सरकारमध्ये अजित पवार गटाचा सहभाग झाल्यानंतर या पालकमंत्रिपदाच्या वाटपावरून शिंदे गट आणि अजित पवार गटात संघर्षही सुरू असल्याचं बघायला मिळालं. या पार्श्वभूमीवर अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी बुधवारी (४ ऑक्टोबर) जाहीर केली. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सरकारने जाहीर केलेल्या पालकमंत्र्यांच्या सुधारित यादीत मोठा बदल म्हणजे भाजपाचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून पुण्याचं पालकमंत्रीपद काढून ते अजित पवारांकडे देण्यात आलं आहे. चंद्रकांत पाटलांना पुण्याऐवजी सोलापूर आणि अमरावतीचं पालकमंत्रीपद दिलं आहे.

सुधारित १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे:

पुणे – अजित पवार

अकोला – राधाकृष्ण विखे- पाटील

सोलापूर – चंद्रकांत पाटील

अमरावती – चंद्रकांत पाटील

भंडारा – विजयकुमार गावित

बुलढाणा – दिलीप वळसे-पाटील

कोल्हापूर – हसन मुश्रीफ

गोंदिया – धर्मरावबाबा आत्राम

बीड – धनंजय मुंडे

परभणी – संजय बनसोडे

नंदूरबार – अनिल भा. पाटील

वर्धा – सुधीर मुनगंटीवार

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची यादी जाहीर असली, तर ज्या रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिंदे गट आणि अजित पवार गटात सर्वाधिक संघर्ष पाहायला मिळाला त्याचा निर्णय या यादीत घेण्यात आलेला नाही. रायगडच्या पालकमंत्रिपदाचा अतिरिक्त भार सध्या शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांच्याकडेच आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde declare list of 11 district guardian minister pbs
First published on: 04-10-2023 at 13:52 IST