मुंबईतील शिवाजी पार्कवर आज मनसेचा दीपोत्सव कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दीपोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकासआघाडी सरकार विरोधात टोलेबाजी केली आहे. “या वर्षी सर्व सण-उत्सव उत्साहात साजरे करण्याचं आमच्या सरकारने ठरवलं होतं. हे वचन आम्ही पाळलं आहे. आत्तापर्यंत सर्व दबून बसले होते. मात्र, आता सगळ्यांनी मोकळा श्वास घेतला आहे”, असे शिंदे यांनी म्हटले आहे.
महाविकासआघाडीच्या सत्ताकाळात गेली दोन वर्ष सण-उत्सवांवर निर्बंध घालण्यात आले होते. यावरुन शिंदे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमात मनात इच्छा असतानाही अनेक वर्षांपासून येता आलं नाही. त्यासाठी योगायोग लागतो, अशी खंत यावेळी मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली. हे सरकार सर्वसामान्यांचं आहे. राज ठाकरेंनी या सरकारला हक्काने सूचना कराव्यात. राज ठाकरे मध्यरात्रीसुद्धा मागण्या करू शकतात, असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.
“उद्धव ठाकरे, भास्कर जाधवांचा बदला घेतल्याशिवाय…” नारायण राणेंचं नाव घेत भाजपा नेत्याचे मोठे विधान
‘एनडीआरआफ’चे नियम बाजुला ठेवून राज्यातील शेतकऱ्यांना सरकारने मदत केल्याचंही शिंदे यांनी यावेळी सांगितलं. राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. ठाकरेंच्या शेतकऱ्यांबाबतच्या भावनांचा सन्मान करू, असे शिंदे या दीपोस्तव कार्यक्रमात म्हणाले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या संकल्पनेतून गेल्या १० वर्षांपासून शिवाजी पार्कमध्ये दीपोत्सव कार्यक्रम साजरा केला जातो. या कार्यक्रमात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी लावलेल्या हजेरीनंतर राज्यातील राजकीय समिकरणं बदलतील का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.